राज्यात वाढतीये गुन्हेगारांची संख्या, कारागृहे पडताहेत कमी; आता आणखी 13 नवी कारागृहे होणार

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, कारागृहात डांबण्यात येणाऱ्या गुन्हेगारांची संख्याही वाढत आहे. मात्र, कैद्यांच्या तुलनेत कारागृहांची संख्या कमी असल्याने त्यात दुप्पट-तिप्पट कैदी ठेवण्यात येत होते.

  मुंबई : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, कारागृहात डांबण्यात येणाऱ्या गुन्हेगारांची संख्याही वाढत आहे. मात्र, कैद्यांच्या तुलनेत कारागृहांची संख्या कमी असल्याने त्यात दुप्पट-तिप्पट कैदी ठेवण्यात येत होते. मात्र, आता राज्यात जवळपास १५ हजार कैद्यांना सामावून घेण्याच्या क्षमतेचे आधुनिक पद्धतीचे १३ नवीन कारागृह तयार करण्यात येत आहे.

  कैद्यांच्या तुलनेत कारागृहांची संख्या कमी

  कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्याच्या यादीत देशभरातून महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर उत्तरप्रदेश-बिहार यांचा क्रमांक लागतो. सध्या राज्यात ६० कारागृहे असून, त्यात २६ हजार ३७७ बंदिवान ठेवता येतील एवढी क्षमता आहे. मात्र, कारागृहात क्षमतेपेक्षा जवळपास दीडपट म्हणजेच ४० हजार ४८५ कैदी बंदिस्त आहेत.

  पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही हल्ले

  गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहात कैद्यांमध्ये मारामारी किवा टोळीयुद्ध होत असल्याच्या घटना घडत आहेत. एकमेकांवर प्राणघातक हल्ला करणे किंवा खून करण्यापर्यंत घटना घडत आहेत. तसेच कारागृहातील पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरही कैदी हल्ले करीत असल्याच्या अनेक घटना राज्यभरातून समोर आल्या आहेत.

  आधुनिक असतील नवी कारागृहे

  हिंगोली, ठाणे, गोंदिया, जळगाव-भुसावळ, पालघर, तुर्भे, येरवरडा, नगर-नारायणडोह, नांदेड, अलीबाग, बीड, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात नव्याने कारागृह उभारण्यात येणार आहेत. शासनाकडून जमीन अधिगृहित करण्यात आली असून लवकरच नव्या कारागृहाच्या निर्माणकार्याला सुरुवात होणार आहे. वरील सर्व कारागृहे आधुनिक पद्धतीची असतील. त्यामुळे कैदी पळून जाणे किवा मारामारी करण्याच्या घटनांवर नियंत्रण येईल.