आता एकनाथ शिंदे हेच स्ट्राँग मराठा लीडर; प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य

मराठा समाजाने मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलनाव्दारे ज्या मागण्या केल्या. त्या मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आता स्ट्राँग मराठा लीडर म्हणून पुढे आले आहेत. शिंदेच्या भूमिकेमुळे इतर मराठा नेते हे क्लीन बोल्ड झाले असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

  माढा : मराठा समाजाने मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलनाव्दारे ज्या मागण्या केल्या. त्या मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आता स्ट्राँग मराठा लीडर म्हणून पुढे आले आहेत. शिंदेच्या भूमिकेमुळे इतर मराठा नेते हे क्लीन बोल्ड झाले असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
  माढ्यातील ओबिसी मेळाव्याच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर माढ्यात आले होते. मेळाव्याच्या अगोदर शासकीय विश्रामगृहात आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

  एकनाथ शिंदेच्या या पुढाकारातील निर्णयामुळे भाजपचे मोठं नुकसान झाले आहे. भाजपने एकनाथ शिंदेना पुढे करुन ओबीसी समाजाला खेचण्याचा प्रयत्न करत होता.मात्र यात मराठा समाज व ओबीसी समाजाचा फटका भाजपला बसणार आहे. मराठा समाजाच्या इतर नेत्यांना बाजुला सारून पुढे गेले अाहेत. एकनाथ शिंदे सगळ्या मराठा नेत्यांच्यावर आले आहेत. धाडसी आणी चांगला माणुस आहे. सहानुभूती समाजात निर्माण झाली आहे. दुसरीकडे ओबीसी मराठा समाजात या निर्णया मुळे दरी वाढली आहे. ओबीसी समाजाचे नेते या विरोधात कोर्टात व इतर मार्गाने विरोधात जातील. आम्हाला सत्ता दिल्यावर आम्ही आरक्षणाचा फॉर्म्युला देणार आहोत, असे प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना सांगितले.

  काँग्रेसच्या ताठरपणामुळे इंडियाचे भवितव्य संपले

  काँग्रेसच्या ताठरपणामुळे इंडिया आघाडीचे राष्ट्रीय पातळीवरचे भवितव्य संपले असल्याची भूमिका आंबेडकर यांनी मांडली. काँग्रेस पक्ष एका म्यानात दोन तलवारी ठेवण्याचे काम करतोय. एकीकडे राहुल गांधीमार्फत पक्ष वाढविण्याचे काम चालू आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीतून काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना पुढे करण्याचे काम चालू आहे. भारत जोडो यात्रा पश्चिम बंगाल, बिहार या ठिकाणाहून जाणार आहे. या ठिकाणी प्रमुख असलेले तृणमूल कॉंग्रेस व जेडीयू यांना सामावून घेतले जात नाही. याच ठिकाणी पक्ष वाढीचा कार्यक्रम हाती घेऊन काँग्रेस इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांना राजकीय रित्या धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या अशा भूमिकेमुळेच केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि आता नितीशकुमार यांनी वेगळी वाट धरली आहे त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे भवितव्य संपले आहे.

  महाविकासच्या बैठकीला पदाधिकारी जाणार

  महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून तीस जानेवारीला चर्चेचे निमंत्रण आम्हाला मिळाले असून, त्या चर्चेसाठी जाऊन आम्ही आमचे मुद्दे मांडू. काही मुद्द्यांवर मतभेद असतील तर ते चर्चेतून दूर करण्याचा प्रयत्न करु. राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचे जे झाले ते महाविकास आघाडीत व आमच्यात होऊ नये, यासाठी प्रयत्न करु, असे अॅड. आंबेडकर म्हणाले.