आता शाळांमध्ये ‘आजी आजोबा’ दिवस साजरा होणार; विविध उपक्रम राबविले जाणार, शासनाचा जीआर जारी…

दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या रविवारी आजी-आजोबा दिवस साजरा केला जातो. हाच आजी आजोबा दिवस शाळेत साजरा करण्याच्या सूचना देण्यात आहेत. त्यामुळं आता राज्यातील शाळांमध्ये देखील आजी आजोबा दिन साजरा होणार आहे.

    मुंबई : शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. शाळा कॉलेजमध्ये सध्या टिचर डे, जागतिक महिल दिन, मातृदिन व पितृदिन असे विविध दिन साजरे केले जातात. त्यानंतर आता राज्यातील सर्व शाळांमध्ये (School) आजी आजोबा दिवस (Grandparents Day) साजरा केला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय (GR) आला असून, त्याचं परिपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या रविवारी आजी-आजोबा दिवस साजरा केला जातो. हाच आजी आजोबा दिवस शाळेत साजरा करण्याच्या सूचना देण्यात आहेत. त्यामुळं आता राज्यातील शाळांमध्ये देखील आजी आजोबा दिन साजरा होणार आहे.

    काय म्हटलंय शासन निर्णयात?

    प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या रविवारी ‘आजी आजोबा’ दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने यावर्षी 10 सप्टेंबर, 2023 रोजी ‘आजी आजोबा’ दिवस आहे. राज्यस्तर, जिल्हास्तर आणि शाळास्तरावर त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात यावा. तसंच या प्रस्तावित दिवशी या कार्यक्रमाचं आयोजन शाळेला करता आलं नाही तर शाळेने आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस ‘आजी आजोबा’ दिवस म्हणून साजरा करावा, असं शासन निर्णयात म्हटलं आहे.

    शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जाणार…

    आजच्या काळात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना शिक्षणाबरोबर नात्यांची सुद्धा ओळख होणे महत्वाचे आहे, असं सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. सध्या धकाधकीच्या आयुष्यात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबांचे प्रेम नातवंडांना मिळत नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी-आजोबांवर असते. शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करुन मुलांशी संवाद, खेळ आणि गप्पा गोष्टी तसंच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख करण्यासाठी “आजी आजोबा” दिवस शाळेत साजरा होणार आहे.