आता त्यांनाच अपात्रतेची नोटीस येणार ; आमदार महेश शिंदे यांचे सुताेवाच

आमचे काम पाहून काही जणांना प्रश्‍न पडला, आपले काय होणार. मग त्यांनी राजकीय पार्श्वभूमी पाहून, केवळ चर्चा रंगविल्या आणि आम्ही अपात्र ठरणार, अशी आवई उठवली. प्रत्यक्षात मात्र आम्ही अपात्र ठरतो की काय, याची वाट बघणाऱ्‍यांनाच अपात्र ठरवले जाणार असून, त्यांना नजिकच्या काळात नव्हे येत्या काही दिवसात अपात्रतेबाबतची नोटीस येणार असल्याचे सुतोवाच आमदार महेश शिंदे यांनी केले.

    कोरेगाव : आमचे काम पाहून काही जणांना प्रश्‍न पडला, आपले काय होणार. मग त्यांनी राजकीय पार्श्वभूमी पाहून, केवळ चर्चा रंगविल्या आणि आम्ही अपात्र ठरणार, अशी आवई उठवली. प्रत्यक्षात मात्र आम्ही अपात्र ठरतो की काय, याची वाट बघणाऱ्‍यांनाच अपात्र ठरवले जाणार असून, त्यांना नजिकच्या काळात नव्हे येत्या काही दिवसात अपात्रतेबाबतची नोटीस येणार असल्याचे सुतोवाच आमदार महेश शिंदे यांनी केले.

    कोरेगाव शहरातून सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग, खंडाळा-शिरोळ राज्य मार्ग आणि जिहे-कठापूर ते खेड नांदगिरी प्रमुख जिल्हा मार्ग असून, या मार्गांचे ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण केले जाणार असून, त्यासाठी महायुती सरकारने तब्बल ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ आमदार महेश शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सातारा जकात नाका परिसरात करण्यात आला. त्यावेळी ते बाेलत हाेते.

    राहूल बर्गे म्हणाले, आमदार महेश शिंदे यांच्या रुपाने स्थानिक भूमिपुत्राला विजयी केल्यामुळेच मतदारसंघाचा संपूर्ण विकास होत आहे, हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. विकासकामांमुळे अनेक जण प्रभावीत झाले असून, ते आमच्याबरोबर येत आहेत, ही आनंदाची बाब आहे. आगामी काळात संपूर्ण शहराचा आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी जनतेची ताकद मिळत असून, संपूर्ण शहराचा निश्‍चितपणे कायापालट होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
    माजी नगरसेवक महेश बर्गे यांनी सचिन बर्गे यांच्या प्रवेशामुळे शहरात चांगली ताकद मिळाली आहे. सचिन बर्गे व उपनगराध्यक्ष सुनील बर्गे व मी असे त्रिकुट संपूर्ण शहराला आणि मतदारसंघाला माहीत आहे. ते आज आमच्याबरोबर आहेत, याचे समाधान आहे. अजून काही मंडळी आमच्याबरोबर येणार आहेत. कोरेगाव शहराची ताकद मोठी असून, नजिकच्या काळात त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

    माजी नगरसेवक सचिन बर्गेचा पक्ष प्रवेश
    माजी नगरसेवक सचिन बाळासाहेब बर्गे, संजय तानाजीराव बर्गे-पाटील, माजी उपसरपंच विलासराव शंकरराव बर्गे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अजित विलासराव बर्गे व गणेश येवले यांनी आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार महेश शिंदे यांनी नजिकच्या काळात कोरेगाव शहराबरोबरच मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार असल्याची ग्वाही दिली.

    संपूर्ण महाराष्ट्राचा विकास व्हावा, त्याचबरोबर कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास व्हावा, सर्वसामान्यांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही मोठ्या प्रयासाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महायुती सरकार सत्तेवर आणले. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार यांची ताकद त्याला मिळाली.

    -महेश शिंदे, आमदार