संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या दोन तासांत होणार आहे. पुणे ते शिरूरपर्यंत डबल फ्लायओव्हर आणि तेथून पुढे नगरमार्गे छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस-वे होणार आहे.

    अहमदनगर : पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या दोन तासांत होणार आहे. पुणे ते शिरूरपर्यंत डबल फ्लायओव्हर आणि तेथून पुढे नगरमार्गे छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस-वे होणार आहे. या कामाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. अहमदनगर बायपास आणि नगर करमाळा रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

    यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार प्रा. राम शिंदे, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते. गडकरी म्हणाले की, नगर हा समृद्ध जिल्हा आहे. जिल्ह्यातील अनेक कामे मार्गी लागली आहेत. बहुतांश राष्ट्रीय महामार्ग नगरमधून जात आहेत. जिल्ह्यात ११ हजार कोटी रुपये खर्चाचे १४१ किलोमीटरचे रस्ते होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हे अंतर देखील समृद्धी महामार्गामुळे सोपे होणार आहे.

    नागपूर ते पुणे हे अंतर केवळ साडेचार तासांत पूर्ण होणार आहे. त्यात नगर जिल्ह्याचा मोठा फायदा होणार आहे. या महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या या रस्त्यासाठी एक हजार ९५ हेक्टर जमीन संपादित होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

    डॉ. विखे म्हणाले, खासदारकीच्या काळात रस्ते विकासमंत्री गडकरी नसते, तर मी जिल्ह्याला काहीही देऊ शकलो नसतो. गडकरी यांनी जिल्ह्यासाठी दिलेले योगदान पुढील ४० वर्षे विसरता येणार नाही.