प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मोबाईल वर्गात वापरायला परवानगी नाही, परंतु आता शासन निर्णयाद्वारे विद्यार्थ्यांचे हजेरी ॲपद्वारे होणार आहे. एकीकडे शासन मोबाईल वर्गात वापरू देण्यास परवानगी देत नाही तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची हजेरी ॲपद्वारे सुरू करण्याचा आदेश दिला आहे.

  आटपाडी : मोबाईल वर्गात वापरायला परवानगी नाही, परंतु आता शासन निर्णयाद्वारे विद्यार्थ्यांचे हजेरी ॲपद्वारे होणार आहे. एकीकडे शासन मोबाईल वर्गात वापरू देण्यास परवानगी देत नाही तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची हजेरी ॲपद्वारे सुरू करण्याचा आदेश दिला आहे.

  इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांना नोंदवावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थी उपस्थिती स्विफ्ट चॅट या ॲप्लिकेशनमधील अटेंडन्स बाॅटद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया १ डिसेंबर २०२३ पासून सुरू करण्यात येत आहे.

  शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम, योजना आखण्यास मदत व्हावी, यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईअंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

  विद्या समीक्षा केंद्र, पुणेमार्फत अटेंडन्स बाॅटच्या (चॅटबॉट)च वापरासंबंधी विभाग, तालुका व केंद्रस्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीच्या इयत्तेतील विद्यार्थी उपस्थिती स्विफ्ट चॅट या ॲप्लिकेशनमधील अटेंडन्स बाॅटद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया १ डिसेंबर २०२३ पासून सुरू करण्यात येणार आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांना या अटेंडन्स बॉटवर (चॅटबॉट)वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्याबाबत मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत

  याबाबत सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना या अटेंडन्स बॉटवर (चॅटबॉट)विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्यासाठी आदेशित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, नगरपालिका, महापािलका प्रशासन अधिकारी, सर्व शिक्षण निरीक्षकांना समग्र शिक्षा महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबईच्या राज्य प्रकल्प संचालकांनी पत्र दिले आहे

  ॲप्लिकेशनचा नव्याने भार
  राज्यातील शिक्षक आधीच अशैक्षणिक आणि विविध ॲपचा वापर करून अक्षरश: वैतागले आहेत. त्यांना विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी वेळच मिळत नाही. अशात आता अटेंडन्स बोट नावाच्या आणखी एका ॲप्लिकेशनचा त्यांच्यावर भार येणार आहे.

  शासनाच्या निर्णयाने दुहेरी पेच
  एकीकडे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वर्गात मोबाईल वापर करु नये, अशा सक्तीच्या सुचना वरिष्ठ स्तरावरुन देण्यात आलेल्या असताना दुसरीकडे मोबाईल ॲपद्वरे विद्यार्थ्यांची हजेरी नोंद करण्याची प्रक्रिया जोमात सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मोबाईल वर्गात नेण्यास प्रतिबंध तर दुसरीकडे अॅपचा वापर करा, अशी दुहेरी सुचना असल्याने शिक्षक-विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत.