आता कारागृहांची दारं होणार संशोधनासाठी खुली; तुरुंग प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

कारागृह (Jail) म्हटलं की, सर्वसामान्यांच्या डोळ्यापुढे चित्रपटात दाखविलेल्या चित्रफीतच उभी राहते अन् त्यात रस्त्यांवरून कारागृह कधी पाहिला भेटलं तर उंच दगडांच्या भिंती अन् भलेमोठे दरवाजे इतकच काय ते डोळ्यांना दिसत.

पुणे : कारागृह (Jail) म्हटलं की, सर्वसामान्यांच्या डोळ्यापुढे चित्रपटात दाखविलेल्या चित्रफीतच उभी राहते अन् त्यात रस्त्यांवरून कारागृह कधी पाहिला भेटलं तर उंच दगडांच्या भिंती अन् भलेमोठे दरवाजे इतकच काय ते डोळ्यांना दिसत. मग, काल्पनिकता आणखीच वाढते अन् मनात वेगवेगळ्या कल्पना येतात. परंतु, आता कारागृह प्रशासनाने या सर्व कल्पनांना पूर्णविराम देत सामाजिक संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना कारागृहात प्रवेश देऊन त्यांना संशोधन (Research Study in Jail) करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कैद्यांची मानसिक स्थिती, त्यांच्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व कामकाज याची माहिती कळू शकणार आहे. त्यासोबतच या संशोधनाचा उपयोग कारागृह प्रशासनाला देखील होणार आहे.

राज्य कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार, नोंदणीकृत संस्था तसेच शासनमान्य विविध विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधनाकरीता कारागृह भेटीची परवानगी देण्यात आली आहे. कारागृह विभागासाठी आक्षेपार्ह असलेला विषय वगळता इतर बाबींवर संशोधन करता येणार आहे. काही अटींच्या अधिन राहून ही परवानगी दिली गेली आहे. तसेच महाविद्यालयातील जास्तीत जास्त 35 विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणास्तव या कारागृहांची भेट देखील देता येणार आहे. भेटींनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे.

कैद्यांच्या विविध सुधारणा आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या उपक्रमांची माहिती मिळणार आहे. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून या क्षेत्रभेटींमुळे ज्ञानवृद्धी होणार आहे. संशोधनामुळे प्राप्त होणाऱ्या अहवालावरून सुधारणात्मक बदल घडण्यास मदत होईल, या संशोधनामुळे बंद्यांच्या समस्या तसेच विविध पैलूंवर प्रकाश टाकता येणार आहे.

ग्रुपने देता येणार कारागृहाला भेट

अनेकांना कारागृह पाहण्याची इच्छा असते. महाविद्यालयातील जास्तीतजास्त ३५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणास्तव या कारागृहांना भेट देता येणार आहे. कारागृह अधीक्षकांकडे अर्ज करुन गटाने कारागृहाला भेट देता येणार आहे.

‘समाजकार्य विषयात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कारागृहास भेट देण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती उपलब्ध होईल. तसेच, 35 जणांच्या विद्यार्थी गटाला नियमांच्या अधीन राहून कारागृह पाहता येईल.

– अमिताभ गुप्ता, महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा.