कार्यालयीन वेळेत टाईमपास करणा-या महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांवर आता ‘वॉच’ 

कार्यालयीन वेळेत टाईमपास करणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांवर आता ‘वॉच’ राहणार आहे. विभागात काम न करता इतरत्र फिरणा-या कर्मचा-यांची तपासणी करुन त्यांच्यावरील कारवाईसाठी सहाय्यक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली 7 जणांच्या तपासणी पथकाची नियुक्ती केली आहे.

  पिंपरी :  कार्यालयीन वेळेत टाईमपास करणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांवर आता ‘वॉच’ राहणार आहे. विभागात काम न करता इतरत्र फिरणा-या कर्मचा-यांची तपासणी करुन त्यांच्यावरील कारवाईसाठी सहाय्यक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली 7 जणांच्या तपासणी पथकाची नियुक्ती केली आहे. दोषींवर हे पथक दंडात्मक कारवाईची शिफारस करणार आहे. याबाबतचा आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी काढला आहे.
  प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे यांच्या नियंत्रणाखालील समितीत प्रभारी प्रशासन अधिकारी नंदकुमार यनपुरे, मुख्य लिपिक राकेश सौदे, बाळासाहेब तुंगे, लिपिक समीर ठाकर, सत्यजित मुंगी आणि सागर नेवाळे यांचा समावेश आहे. शासन, महापालिकेने केलेल्या लेखापरिक्षणामध्ये कामकाजातील अनियमितता, आर्थिकबाबी संदर्भात बरेच आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्याची वेळेत पूर्तता होणे आवश्यक आहे. वेळीच कार्यालयीन शिस्तीबाबत पायबंद घालून शिस्त व नियम याची जाणीव करुन देणे गरजेचे आहे. कामकाजामध्ये पारदर्शकता येणे, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, कामे विहित मुदतीत पूर्ण केली जातात किंवा कसे, कार्यालयीन कामकाजात असलेल्या त्रुटी, उणीव दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेतील विभागांची संपूर्ण, अंशंत: तपासणी केल्यास प्रशासन विभागाचे प्रभावी नियंत्रण राहण्याच्या दृष्टीने सात जणांचे तपासणी पथक निर्माण करण्यात आले आहे.
  पथकातील अधिकारी, कर्मचा-यांनी दररोजचा कामकाज अहवाल प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर आणि साप्ताहिक अहवाल अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना सादर करावयाचा आहे. उपलेखापल सुनील कोरके यांनी आर्थिकबाबी तर कॉम्प्युटर ऑपरेटर प्रदीप बोराटे यांनी संगणकीय मदत तपासणी पथकाला करायची आहे. पथकाच्या फिरतीसाठी वाहनचालक अभिजीत मोरे यांनी प्रशासन अधिका-यांच्या नियंत्रण व सुचनेनुसार काम करायचे आहे. पथकाने अधिका-यांच्या कामकाजाबाबत प्रस्ताव प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांमार्फत अतिरिक्त आयुक्त, आयुक्तांकडे सादर करावा तसेच गट क व ड मधील कर्मचारी यांच्याबाबत नोटीस देऊन खुलासा मागविण्यात यावा. खुलाशाबाबत सहाय्यक आयुक्तांना शास्तीची कारवाई करता येईल. या अधिकारात पूर्णत: अथवा अशंत: बदल करणे, प्रदान केलेले अधिकार काढून घेण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी राखून ठेवले आहेत. अधिकारी, कर्मचा-यांना तपासणीच्यावेळी सर्व कर्मचा-यांनी पूर्ण सहकार्य करण्याची दक्षता घ्यावी. आवश्यक तपासणीकामी कागदपत्रे, माहिती त्वरित उपलब्ध करुन द्यावी, असे परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे.
  तपासणी पथकाचे काम!
  1) महापालिकेच्या सर्व विभागामधील हजेरीपत्रकाची व बायोमेट्रीक (थम्ब इम्प्रेशन) उपस्थितीबाबत तपासणी करणे
  2) गट क मधील कर्मचा-यांकडील कामकाज (विषय) विभागांतर्गत बदलण्यात आले किंवा कसे याबाबतची तपासणी
  3) कार्यालयीन वेळेत विभागात काम न करता इतरत्र फिरणा-या कर्मचा-यांची तपासणी करुन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करणे
  4) फिरती कर्मचा-यांच्या फिरती रजिस्टरमधील नोंदी तपासणे
  5) अधिकारी, कर्मचारी यांचे कुटुंब निवृत्तीवेतनाकरिता नामनिर्देशन फॉर्म मूळ प्रत सेवा पुस्तकात डकविण्यात आलेल्याबाबत तपासणी
  6) सेवानिवृत्त, स्वेच्छा निवृत्त, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांची सेवानिवृत्ती विहीत मुदतीत करुन घेणे, त्यासंदर्भातील सर्व लाभ सेवानिवृत्ती कर्मचा-यांना मिळतो किंवा नाही, त्याची तपासणी
  7) मुख्य लेखापरिक्षक, शासनाकडील काढल्या जाणा-या आक्षेपाची वेळच्यावेळी पूर्तता केली जाते किंवा नाही, याची तपासणी
  8) विविध विभागातील साप्ताहिक कार्यविवरण गोषवारा, प्रलंबित प्रकरणाची तपासणी
  9) महापालिकेकडे येणा-या शासकीय, निमशासकीय पत्रांचा गोषवारा करुन विलंबाबाबतची तपासणी
  10) आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांकडे येणा-या लेखी, निनावी तक्रार पत्रे, निनावी दूरध्वनी, वर्तमान पत्रातील महापालिका हितसंबधीत बाबींची तथ्य असल्यास तपासणी
  11) आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना आवश्यक वाटेल तेव्हा तपासणी पथकाम दिलेल्या आदेशानुसार तपासणी करणे
  12) सर्व खातेप्रमुख, विभागांना आयुक्तांनी कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने केलेल्या आदेशाप्रमाणे संबंधित विभागामध्ये कामकाज केले जाते कि नाही, याची तपासणी करणे, त्याचा अहवाल आयुक्तांना सादर करणे