हल्ली कुणाला भाषणाला बोलवायची भीती वाटते; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

महायुतीच्या समन्वय बैठकीत ‘हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटते’, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार केल्याची माहिती सुत्रांनी दिली. हे वक्तव्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याविषयी बारामतीमध्ये जाऊन केलेल्या वक्तव्याशी जोडले जात आहे.

  पुणे : बारामती लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदान झाले. मात्र, तेथिल प्रचारा दरम्यान घडलेल्या घटनांचे पडसाद उमटत असल्याचे दिसून येत आहे. मतदानानंतर महायुतीच्या समन्वय बैठकीत ‘हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटते’, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार केल्याची माहिती सुत्रांनी दिली. हे वक्तव्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याविषयी बारामतीमध्ये जाऊन केलेल्या वक्तव्याशी जोडले जात आहे.
  बारामतीमध्ये प्रचारादरम्यान, माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते, “शेवटी राजकारणात एक तराजू लावायचा असतो. काय वजनदार आहे, काय हलकं आहे, आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा आहे. मला आणि माझ्या कार्यकर्त्याला शरद पवार यांचा पराभव हवा आहे. बाकी काही नको’, असे वक्तव्य केले होते.
  चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याला महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि कार्यकर्त्यांनी मुद्दा केला होता. पाटील यांच्या वक्तव्याने अजित पवार मात्र दुखावले गेले. त्यांनी या वक्तव्यावर नाराजी बोलून दाखवली. ‘हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटते’, असा टोला अजित पवार यांनी महायुतीच्या समन्वय बैठकीत लगावल्याची चर्चा सुरु झाली आहे.
  दरम्यान, शरद पवारांचा पराभव करणे हेच आमचे उदीष्ट हे चंद्रकांत पाटील यांचे विधान चुकीचे. त्यांची चुक झाली हे मी मान्य करतो. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले तुम्ही बारामतीत येऊ नका. आम्ही पाहतो. त्यानंतर ते चूप आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
  संभ्रम निर्माण होण्यासाठी ते विधान करतात
  काँग्रेसमध्ये अनेक पक्ष विलीन होऊ शकतात, असे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले, की शरद पवार अथवा उद्धव ठाकरे हे काही काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत. कधी-कधी संभ्रम निर्माण होण्यासाठी ते असे विधान करतात, असा टोला त्यांनी हाणला.
  अजित पवारांना सुप्रिया सुळेंचे उत्तर
  आपला पक्ष फुटला, चोरला, वगैरे वगैरे सुरू आहे, पण मी आज तेच म्हणते, प्यार से मांगा होता ना सबकुछ दे देते. नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडायला ताकद लागते. मंत्री पद महत्वाचे की निष्ठा महत्वाची? हे तुम्हीच सांगा, अशी विचारणा करत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी केलेल्या ‘मी त्यांच्या पोटी जन्माला आलो असतो…’ वक्तव्यावर पलटवार केला आहे.
  सुळे म्हणाल्या, आता मला त्यांचा स्वभाव माहीत आहे. तुम्हीच तुलना करा ना. कोणाला काय मिळाले याचा हिशोब करा. मला काय मिळाले आणि दादांना काय काय मिळाले. सगळे तुमच्या समोर आहे. सगळे स्पष्ट होईल. खूप सोप्पं उत्तर आहे.