cctv

सातारा लोकसभा मतदारसंघातील (Satara Lok Sabha) ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडल्याचे निदर्शनास आल्याने जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

  उंब्रज : सातारा लोकसभा मतदारसंघातील (Satara Lok Sabha) ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडल्याचे निदर्शनास आल्याने जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी याबाबत गाफील कसे? याबाबत आश्चर्य व्यक्त होत असून, स्वर्गीय टी. एन. शेषन यांच्यासारखा सक्षम अधिकारी आज असता तर संबंधित अधिकाऱ्यांना तडकाफडकी ‘घरचा रस्ता’ दाखवला असता अशीही नागरिकांच्यात चर्चा आहे.

  सीसीटीव्ही यंत्रणा बंद असण्यामागील कारण गुलदस्त्यात असून, देशातील निवडणुकांबाबत जनतेत संभ्रम असताना अशा घटनामुळे संशय अधिक बळावला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सातारा पाठोपाठ बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंच्या तक्रारींमुळे सातारा व पुणे या दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नागरिकांच्या निशाण्यावर आले आहेत.

  सातारा व बारामती मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणुका 7 मे रोजी पार पडल्या आहेत. नागरिकांनी चुरशीने मतदान केले असून, दोन्ही ठिकाणी शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सातारा ही जन्मभूमी आणि बारामती कर्मभूमी असल्याने पवार कुटुंबाना या दोन्ही जिल्ह्यातील जनतेबाबत विशेष प्रेम आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर होणारी पहिलीच निवडणूक अटीतटीची होत आहे.

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे उभ्या ठाकल्या आहेत. काका पुतण्या यांच्यातील शहकाटशह या निमित्ताने जनतेला पाहायला मिळाला असून, सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याच्या चर्चेने काहीतरी काळबेरे तर होणार नाही ना? अशी धास्ती महाविकास आघाडीसह शरद पवारांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.

  मतदान प्रक्रियेची सर्व ईव्हीएम मशिन्स या गोदामात सुरक्षित ठेवल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांच्या काही प्रतिनिधींना सांगितले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रशासकीय यंत्रणेने त्याठिकाची तपासणी केली असता गोदामामध्ये संरक्षणासाठी पोलीस व स्वतंत्र सीसीटीव्ही यंत्रणा आहे.

  ईव्हीएम मशिनच्या संरक्षणासाठी बसवलेच्या सीसीटीव्हीची लिंकही उमेदवार व त्यांच्या उमेदवार प्रतिनिधींना दिलेली आहे. ही लिंक १० मे च्या सकाळपासून गोडावून परिसरातील सीसीटीव्ही कव्हरेज बंद दिसत आहे. त्याची तक्रार करण्यात आली. त्याच तक्रारीची दखल सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेऊन लगेच संबंधित ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.