राहुल शेवाळेंच्या गटनेतेपदी नियुक्तीवर आक्षेप; एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप

आमची बाजू न ऐकता गटनेत्या पदाला मान्यता देण्यात आली. आमच्या पत्राची दखल घेतली नाही. त्यांना बंडखोर गटाचा फ्लोअर लिडर बनवायचा होता तर ज्या दिवशी त्यांनी पत्र दिले त्यादिवशीपासून अंमलबजावणी व्हायला हवी होती. पक्षपातीपणे निर्णय झाल्याची आम्हाला शंका आहे. त्यासंदर्भात अध्यक्षांची भेट घेणार आहे. त्यांना लेखी विचारणा करणार असल्याचे राऊतांनी म्हटले.

    मुंबई : एकनाथ शिंदे समर्थक (Eknath Shinde Supporter) खासदार गटासह राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या गटनेतेपदाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Loksabh Speaker Om Birla) यांनी मान्यता दिली आहे. मात्र, शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप (Objection) घेतला असून तीन पत्र पाठवूनही एकतर्फी निर्णय (Unilateral Decision) घेण्यात आला आहे, असा आरोप केला आहे. विनायक राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते.

    १८ जुलैला रात्री साडेआठ वाजता गटनेतेपदी कोणी दावा केला तर आम्हाला आमचे म्हणणे मांडण्यासाठी संधी द्या, अशा पद्धतीची संधी पत्र देत केली. त्यानंतर २२ जुलैला त्यासंदर्भात भेटून पत्र दिले. मात्र, अचानक लोकसभा पोर्टलवर जे पत्र वाचले तेव्हा यामध्ये अध्यक्षांनी पत्राची दखल घेतली नसल्याचे समजले.

    आमची बाजू न ऐकता गटनेत्या पदाला मान्यता देण्यात आली. आमच्या पत्राची दखल घेतली नाही. त्यांना बंडखोर गटाचा फ्लोअर लिडर बनवायचा होता तर ज्या दिवशी त्यांनी पत्र दिले त्यादिवशीपासून अंमलबजावणी व्हायला हवी होती. परंतु, त्यांनी पत्र दिले १९ तारखेला आणि १८ तारखेला अंमलबजावणी झाली. त्यामुळे, पक्षपातीपणे निर्णय झाल्याची आम्हाला शंका आहे. त्यासंदर्भात अध्यक्षांची भेट घेणार आहे. त्यांना लेखी विचारणा करणार असल्याचे राऊतांनी म्हटले.