सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्यार्थिनीचे आक्षपार्ह व्हिडिओ प्रसारित

  पुणे : सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्यार्थिनीचे आक्षपार्ह व्हिडिओ प्रसारित झाल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनीच्या मैत्रिणीने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर याप्रकरणाची माहिती दिली. याप्रकरणातील दोषींना विद्यापीठ पाठीशी घालत असून विद्यार्थिनीच्या सुरक्षेची चिंताही तिने व्यक्त केली आहे.
  सीओईपी ही राज्यातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी शिक्षण संस्था आहे. मात्र येथील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो प्रसारित झाल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवर केला आहे.
  भुमिका कानडे ही पीडित विद्यार्थिनींची मैत्रीण आहे. तिने रविवारी संध्याकाळी एक्सला जाऊन कथित घटना सांगितली. त्यात म्हटले आहे की, “शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील नामवंत अशा सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठातील वसतिगृहातील व इतर विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो काढून बाहेर पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
  विद्यापीठ प्रशासन संबंधित दोषींना पाठीशी घालून विषय दाबण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. या गंभीर घटनेमुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या ठिकाणी असे गैरप्रकार दाबण्यात असतील तर भविष्यातल्या सेक्स रॅकेटसारख्या गंभीर गुन्ह्याची पार्श्वभूमी तयार झाल्याशिवाय राहणार नाही.”
  ‘नवराष्ट्र’शी बोलताना कानडे म्हणाल्या की, ‘विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या विषयावर भाष्य करायचे नाही. आज मी या विषयावर कोणतेही विशेष विधान देऊ शकत नाही. मी एक दिवसानंतर संपूर्ण माहिती देऊ शकते.’
  सीओईपीचे रजिस्ट्रार डी.एन.सोनवणे म्हणाले, “ही अत्यंत संवेदनशील बाब आहे. आम्ही त्याची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. आम्हाला संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत तपास अहवाल मिळेल. जर कोणी दोषी आढळले तर त्याच्या विरुध्द आम्ही कठोर कारवाई करू.