प्रसिद्ध मोबाईल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना अटक, व्हिवो अन् लाव्हा कंपनीचे अधिकाऱ्यांची ईडीकडून कसून चौकशी, मनी लॉंड्रींग प्रकरणात मोठी कारवाई

    ED Action : मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचलनालय, म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. चिनी मोबाईल कंपनी व्हिवोच्या चार अधिकाऱ्यांना ईडीने अटक केली आहे. यामध्ये एका चिनी नागरिकाचाही समावेश आहे. यासोबतच लाव्हा इंटरनॅशनल या मोबाईल कंपनीचे संस्थापक आणि मॅनेजिंग डिरेक्टर हरी ओम राय यांनादेखील अटक करण्यात आली आहे.

    लाव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांचा मोठा सहभाग

    गेल्या वर्षी मनी लाँड्रिंग प्रकरणी देशभरात 48 ठिकाणी झालेल्या छापेमारीनंतर याबाबत अधिक तपास सुरू होता. या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. लाव्हा कंपनीच्या हरी ओम राय यांचा या प्रकरणात नेमका कसा सहभाग आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

    गेल्या वर्षी 3 फेब्रुवारीला PMLA कायद्याअंतर्गत ईडीने या कंपन्यांवर छापेमारी सुरू केली होती. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनंतर ही कारवाई सुरू करण्यात आली होती. या प्रकरणात व्हिवोसोबत अन्य 23 कंपन्यांवर छापे पडले होते. यामध्ये ग्रँड प्रॉस्पेक्ट इंटरनॅशनल कम्युनिटीज (GPICPL) या कंपनीचा देखील समावेश होता.

    ईडीने असे आरोप केले आहेत, की भारतातून अवैधरित्या चीनमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात या कंपन्यांचा हात होता. व्हिवोने भारतात कमवलेल्या पैशांपैकी अर्धी रक्कम, म्हणजेच तब्बल 1.25 लाख कोटी रुपये चीनला पाठवल्याचा आरोपही ईडीने केला होता. कर चुकवण्यासाठी कंपनीने हे पैसे तिकडे पाठवल्याचं ईडीने म्हटलं आहे.