अधिकाऱ्यांनी बंद पाडली झेडपी; मुख्यालयासह 11 पंचायत समितीचे कामकाज ठप्प, धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयाची तोडफोडीनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी झेडपी (Solapur ZP) बंद पाडली आहे. मुख्यालयासह ११ पंचायात समितीचे कामकाज ठप्प झाले आहे. कार्यालय तोडफोडीचे पडसाद प्रशासकीय कामकाजावर उमटले आहेत. मंगळवारी सर्व कर्मचारी संघटना (Employee Union) एकत्रित येत कामकाज बंद पाडले.

    सोलापूर : सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयाची तोडफोडीनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी झेडपी (Solapur ZP) बंद पाडली आहे. मुख्यालयासह ११ पंचायात समितीचे कामकाज ठप्प झाले आहे. कार्यालय तोडफोडीचे पडसाद प्रशासकीय कामकाजावर उमटले आहेत. मंगळवारी सर्व कर्मचारी संघटना (Employee Union) एकत्रित येत कामकाज बंद पाडले. अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तर इकडे आंदोलन करून सीईओ कार्यालय तोडफोडप्रकरणी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बिंदू नामावलीत धनगर आरक्षणानुसारच शिक्षक भरती व्हावी, या मागणीसाठी धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी सीईओ कार्यालयाची तोडफोड केली. तोडफोड केलेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आठ जणांविरुद्ध 353 सह इतर 12 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सुभाष मस्के व भाजपचे कार्यकर्ते माऊली हळणवर यांची नावे आहेत.

    सीईओ कक्षाचे परिचारक राम भैरू चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शरणप्पा शिवराया हांडे (रा. साईनगर), धनाजी विष्णु गड्डे (रा. नंदेश्वर ता. मंगळवेढा), अंकुश केराप्पा गरंडे (रा.बोरगाव ता. अक्कलकोट), सोमसिंग श्रीमंत घोडके (रा.बोरगाव, ता अक्कलकोट), अनोळखी इसम माऊली हळणवार, सुभाष मस्के (दोघे रा.पंढरपुर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यालयीन तोडफोड करणाऱ्यावर जोपर्यंत फौजदारी कारवाई होत नाही, तोपर्यंत मुख्यालयसह ११ पंचायात समितीचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्धार कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला. झेडपी बिंदू नामावली धनगर समाजाच्या साडेतीन टक्के आरक्षणानुसार शिक्षक भरती व्हावी, या मागणीसाठी धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. यामध्ये अनेक खुर्च्या मोडल्या आहेत. खिडक्याच्या त्याचा फोडल्या आहेत.

    हा हल्ला म्हणजे आमच्या कुटुंबप्रमुखाच्या थेट खुर्चीवर हल्ला आहे. यापुढे सोलापूर झेडपीमध्ये अशी कोणतीही घटना घडू नये, अशी अपेक्षा व्यक्त करत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करावी. अन्यथा अकरा पंचायत समित्या उघडणार नाहीत, असा इशारा देण्यात आला.

    दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील , समाजकल्याण धिकारी सुनिल खमितकर यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दिला. यावेळी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे, युनियनचे राज्यसरचिटणीस विवेक लिंगराज , मराठा सेवा संघ कर्मचारी संघटना अध्यक्ष अविनाश गोडसे , आरोग्य संघटनेचे समीर शेख, बहूजन कर्मचारी संघटना अध्यक्ष गिरीष जाधव , कंत्राटी कर्मचारी संघटना अध्यक्ष सचिन जाधव, कास्ट्राईब कर्मचारी संघटना सचिव संजय कांबळे , दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण वंजारी यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

    ‘सीईओ यांच्या कार्यालयाची तोडफोड करणे हे निंदनीय कृत्य केले आहे. निषेध व्यक्त करण्यासाठी अधिकारी कर्मचारी काम बंद करत आहेत’.

    – इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

    जिल्हा परिषदेच्या कार्यालयात घुसून कार्यालयाची तोडफोड करून शासकीय कामकाज बंद पाडणे ही निंदनीय घटना आहे. सीईओ यांच्या समवेत सर्व अधिकारी व कर्मचारी असून, या घटनेचा निषेध व्यक्त केला.

    – स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

    सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषदेमध्ये घडलेल्या घटनेचा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी निषेध व्यक्त केला. ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलनाशिवाय पर्याय नाही.

    – संदीप कोहिनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी.