मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत महात्मा जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र लावणार

छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशन काळात प्रत्यक्ष भेटून याबाबत मागणी केली होती.

    मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मागणीनुसार मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये महात्मा जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज छगन भुजबळ यांनी माजी खासदार समीर भुजबळ आणि चित्रकार राजेश सावंत यांच्यासह मंत्रालयात जाऊन जागेची पाहणी करत तैलचित्र कुठे लावली जावीत याबाबत सूचना करून अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि चर्चा केली.

    छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशन काळात प्रत्यक्ष भेटून याबाबत मागणी केली होती. यावेळी मंत्रालयात त्यांच्यासोबत सामान्य प्रशासन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    याबाबत आज शासनाच्या वतीने मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात निर्णय घेतल्याबद्दल छगन भुजबळ यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.