महाराष्ट्र जनरल मजदुर संघटनेच्या वतीने कामगारांना सेफ्टी किटचे वाटप व महाआरोग्य शिबीर संपन्न

सर्व शासकिय योजनांचा लाभ घेण्याकरिता कामगारांनी संघटनेच्या ऑफिसमध्ये येऊन आपली नोंदणी करून घ्यावी असे संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ कामगारांना सांगत असतात.

    डोंबिवली : शासन नोंदणीकृत असलेल्या महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना माध्यमातून कष्टकरी नाका कामगारांना गुरुवारी सकाळी ९ ते सायं ६ या वेळेत २८३ हुन अधिक नाका कामगारांना सेफ्टीकीट व अत्यावश्यक संच आणि सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले. यादरम्यान उपस्थित सर्व नाका कामगारांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

    पूर्वेकडील स्टेशनजवळील पाटकर रोडवर आयोजित या कार्यक्रमात कामगारांना सेफ्टी किटचे वाटप व महाआरोग्य शिबीरात कामगारांनी मोठी गर्दी केली होती. संघटना कामगारांसाठी करीत असलेल्या भरीव कामगिरीवर कामगार आनंदी दिसत होते. शासनाने प्रत्येक कामगाराची दखल घ्यावी यासाठी संघटना प्रत्येक कामगाराला नोंदणी करण्याचा आग्रह करीत आहे असेही सांगितले जात होते. प्रत्येक कामगारांने स्वतःच्या भवितव्यासाठी दिलेल्या किटचा काम करतांना वापर करा असे आग्रहाने सांगण्यात येत होते.

    नोंदणीकृत कामगारांना संघटनेच्या प्रयत्नातून नाका कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक शिष्यवृती १ ली ते ७ वी पर्यंत २५०० रू, ८ वी ते १० वी ५ हजार, ११ वी १२ वी १० हजार, महाविद्यालयीन पदवी प्रथम ते तृतीया वर्ष २० हजार, इंजिनियरिंग शिक्षणाकरिता प्रती वर्षी ६० हजार, वैद्यकीय शिक्षण करिता प्रती वर्षी १ लाख रुपये, कामगारांच्या स्वतःच्या विवाहाकरिता ३० हजार, कामगारांच्या मुलींच्या विवाहकरिता ५१ हजार, कामगारांच्या पत्नी प्रसूती नॉर्मल ₹ १५ हजार व सिजरिंग २० हजार तसेच कामगार काम करत असताना निधन झाल्यास वारसांना ५ लाख रुपये, काम करत असताना अपंगत्व आल्यास २ लाख रुपये, कुटुंबातील ४ व्यक्तींना गंभीर आजारकरिता १ लाख रुपये आर्थिक सहाय्य केले जाते. अशा विविध ३० योजनांवर संघटना कामकाज करते. या सर्व शासकिय योजनांचा लाभ घेण्याकरिता कामगारांनी संघटनेच्या ऑफिसमध्ये येऊन आपली नोंदणी करून घ्यावी असे संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ कामगारांना सांगत असतात.

    महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना कामगारांना लाभ मिळवुन देण्याकरीता अहोरात्र मेहनत करत असते. कामगारांना सेफ्टी किटचे वाटप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, पालिकेचे फ प्रभागक्षेत्र अधिकारी जयवंत चौधरी, रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ व आरपीआय नेते माणिक उघडे, काँग्रेस पदाधिकारी अजय पौळकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ, युवाध्यक्ष नामदेव भानुसे, खजिनदार विश्वनाथ रेवगडे, महिला शहराध्यक्ष वंदना जाधव, केंद्रिय कमिटी सदस्य राणा शेठ, कार्यालय प्रमुख कारभारी रेवगडे, नाका अध्यक्ष रामेश्वर शेजुळ, डोंबिवली उपाध्यक्ष रामचंद्र वाघ, कुर्ला जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.