कणकवलीत ठाकरे सेनेच्या वतीने विधानसभा अध्यक्षांचा निषेध, निकाल विरोधात दिल्याने फडकवले निषेधाचे फलक ; जोरदार घोषणाबाजी

    कणकवली : शिवसेना कोणाची? याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल जाहीर केला.त्यानंतर संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कणकवली नरडवे नाका येथे एकत्र येत विधानसभा अध्यक्षांचा काळे फलक दाखवत जाहीर निषेध केला. यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात जोरदार शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.

    शिवसेना कोणाची ?याबाबत निकाल दिल्यानंतर कणकवली शिवसैनिकांनी गोळा होत काळ्या फलकावर विधानसभा अध्यक्षांचा निषेध केला. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुका प्रमुख उत्तम लोके, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, दिव्या साळगावकर, ठाकरे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, राजू राठोड, कन्हैया पारकर, भालचंद्र दळवी, रुपेश आमडोसकर, नितेश भोगले, धीरज मेस्त्री, रिमेश चव्हाण, महेश कोदे आदी ठाकरे शिवसेना गटाचे शिवसैनिक उपस्थित होते.

    .

    यावेळी सुशांत नाईक म्हणाले,विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्षासंदर्भात दिलेला हा राजकीय हेतूने प्रेरित होऊन दिलेला आहे. या निकालाला अनेक महिने काढत सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर आज हा निकाल जाहीर केला. हा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष हे एका पक्षाचे नेते आहेत, त्यांनी पक्षाच्या आदेशानुसारच हा निकाल दिलेला आहे. येत्या काळात लोकसभा निवडणूक आहे यावेळी जनतेच्या दरबारात आम्ही जाणार आहोत. तसेच निकाल पूर्णपणे शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने दिलेला आहे. हा न्यायालयाचा अपमान आहे, हा अपमान जनता सहन करणार नाही.जनता हा बदला निवडणुकीत घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. शिवसेना कोणाची ही जनता ठरवेल.