CRIME

    पुणे : वानवडीत ऐन दिवाळीत सराफी व्यावसायिकाला लुटलेले असताना भारती विद्यापीठ पोलिसांनी मात्र, अशीच एक घटना होण्यापासून रोखली आहे. पोलिसांनी सराफी पेढी लुटण्याचा डाव उधळून लावत चोरट्यांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, पाच काडतुसे तीन दुचाकी, असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे एका खुनाचादेखील कट उधळला गेला असून, मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ते खून करणार होते.
    या आरोपींना केली अटक
    राधेमोहन उर्फ मुन्ना सीताराम पिसे (वय १९, रा. वारजे माळवाडी), समीर ज्ञानेश्वर मारणे (वय २०, रा. नऱ्हे)स अर्जुन मोहन बेलदरे (वय २०, रा. आंबेगाव, कात्रज), तुषार दिलीप माने (वय १९), यश मनोज लोहकरे (वय १९), अनिल दिलीप माने (वय २०), ओंकार उर्फ मयुर दादासाहेब माने (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, मंगेश पवार, सचिन सरपाले, मितेश चोरमोले आदींनी ही कामगिरी केली.
    सराफी पेढीवर दरोडा घालण्यासाठी चोरट्यांची टोळी

    वानवडी परिसरात दोन दिवसांपूर्वीच एका सराफी व्यावसायिकावर गोळीबार करून त्यांच्याकडील सोने लुटून नेण्यात आले होते. अद्याप चोरट्यांना पकडण्यात यश आलेले नाही. दुसरीकडे शहरात दिवाळीनिमित्ताने खरेदीला मोठी गर्दी होत आहे. तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकात खरेदीसाठी गर्दी होत असते. या भागातील सराफी पेढीवर दरोडा घालण्यासाठी चोरट्यांची टोळी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपी पिसे, मारणे, बेलदरे, माने, लोहकरे, माने, यांना पकडले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, पाच काडतुसे, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी
    आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या मित्राचा खून झाला होता. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी पैशांची जुळवाजुळव सुरू केली होती. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी भारती विद्यापीठ परिसरातील सराफी पेढी लुटण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. ते खून करणार होते. खूनानंतर जामीनासाठी त्यांना पैशांची आवश्यकता भासणार होती. त्यासाठी त्यांनी लुटण्याचा कट रचला होता.