रविवारी मुंबईकरांचा खोळंबा! तिन्ही मार्गावर असणार मेगाब्लॉक

या मार्गांवर असणार रविवारी १२ मे रोजी जम्बो मेगाब्लॉक. वाचा सविस्तर वेळापत्रक

  रविवारी मेगाब्लॉकचे वेळापत्रक : रविवार असणार आणि मुंबई रेल्वे ट्रेनचे वेळापत्रक बदलणार नाही असं फार कमी वेळा होत. तुमचा जर रविवारी 12 मे रोजी बाहेर जायचे असेल तर तुम्हाला नक्कीच मुंबई रेल्वे ट्रेनच्या वेळापत्रकावर नजर टाकणं गरजेचं आहे. रविवारी रेल्वेने प्रवास करण्याचे ठरवले असेल तर दोनदा विचार करा कारण पश्चिम, मध्यची मेन लाईन आणि हार्बर या तीनही उपनगरीय कॉरिडॉरवर मेंटेनन्स ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्या मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक आहे त्याची सविस्तर माहितीवर एकदा नजर टाका.

  वेस्टर्न मार्ग (Western Line)
  ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी, सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान 12 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  सेंट्रल मार्ग (Central Line)
  सेंट्रल लाईनचे मुंबई विभाग माटुंगा आणि मुलुंड अप आणि डाऊन फास्ट लाईन दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 3.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.25 ते दुपारी 2.45 पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाण्याच्या पुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, सकाळी 10.50 ते दुपारी 3.08 वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप फास्ट सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. दोन्ही दिशेने गाड्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा धावणार आहेत.

  हार्बर मार्ग (Harbour line)
  हार्बर मार्गावर, कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत कोणतीही सेवा धावणार नाही. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष गाड्या चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना 12 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे.