दुर्दैवी घटना! विवाहानंतर ६ व्या दिवशी वराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

विवाह झाल्यानंतर सुखी संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या वराचे लग्नानंतर अवघ्या सहाव्या दिवशी ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने नववधु असलेल्या हर्षदावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.ही दुर्दैवी घटना येळेवस्ती माळेगाव येथे गुरुवार( दि.२४) पहाटे घडली.

    बारामती: विवाह झाल्यानंतर सुखी संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या वराचे लग्नानंतर अवघ्या सहाव्या दिवशी ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने नववधु असलेल्या हर्षदावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
    ही दुर्दैवी घटना येळेवस्ती माळेगाव येथे गुरुवार( दि.२४) पहाटे घडली.सदर घटनेने येळेवस्तीसह संपूर्ण माळेगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

    माळेगाव कारखान्याचे कर्मचारी अनिल येळे यांचे तृतीय चिरंजीव सचिन ऊर्फ बबलु अनिल येळे (वय २७ रा.येळेवस्ती माळेगाव) यांचा विवाह नववधु हर्षदा संतोबा बोरकर ( रा पीपळा जि.परभणी) हिच्याशी दि.१९ नोव्हेंबर रोजी शारदानगर येथील अनुज गार्डन येथे अतिशय थाटात साजरा झाला.या विवाहा नंतर येळे कुंटुबाने परंपरेने देवदर्शन करून मंगळवारी विधी नुसार सोहळा पार पडला.दोघांनी ही आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवली.मात्र गुरुवारी पहाटे सचिनला अस्वस्थ वाटू लागल्याने नववधु हर्षदाने कुटुंबियांना सांगितले.मात्र दुर्दैवाने सचिन याचा ह्रदय विकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले.या अनपेक्षित घटननेने एकच आक्रोश सुरू झाला.पहाता पहाता वस्तीमधील नागरिक जमा झाले . सगळेच धायमोकलून रडू लागले.

    ज्या घरासमोरील मंडपात आनंद साजरा केला; त्याच मंडपात सचिनचा मृतदेह ठेवण्याची दुर्देवी वेळ येळे कुटुबांवर आली होती.अखेर अतिशय शोकाकुल वातावरणात सचिन याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.दरम्यान, सचिन येळे यांच्या पश्चात पत्नी,आई, वडील, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे.