अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले विद्यापीठात अभाविप’च्या वतीने ३७५ फूट तिरंगा पदयात्रा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शाखेमार्फत दिनांक १४ ऑगस्ट ला सावित्रीबाई फुले विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य ३७५ फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.

    पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शाखेमार्फत दिनांक १४ ऑगस्ट ला सावित्रीबाई फुले विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य ३७५ फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड ते विद्यापीठ मुख्य इमारत अशी ही पदयात्रा काढण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. याचेच औचित्य साधून अभाविप च्या वतीने भारतभर विविध ठिकाणी तिरंगा पदयात्रा व ध्वजारोहण करण्यात येत आहे.

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथमतः च भव्य अशी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, विद्यापीठ हायस्कूल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी या पदयात्रेस संबोधित केले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करणे आवश्यक आहे, त्यासाठी असे उपक्रम राबविले जाणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. तरुणांचं या देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान राहिले आहे. भारताला विश्र्वगुरू बनवायचे असेल तर तरुणांनी राष्ट्रप्रथम भावना ठेवून कार्य केले पाहिजे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी समारोप प्रसंगी व्यक्त केले.

    विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे , विद्यापीठ हायस्कूल चे मुख्याध्यापक कृष्णकांत केंगार सर, अभाविप प्रदेश कार्यालय मंत्री विलास ठाकरे, प्रदेश सह कार्यालय मंत्री कौस्तुभ पिले, प्रदेश शोधकार्य संयोजक आंबादास मेव्हणकर आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी जिल्हा संयोजक शांभवी साले यांनी प्रास्ताविक केले. विद्यापीठ अध्यक्ष महादेव रंगा यांनी उपस्थितांचे आभार मानले.