‘महाकाल लोक’ लोकार्पणानिमित्त भाजपातर्फे राज्यातील ५०० शिवालयांमध्ये कार्यक्रम

उज्जैन येथे होणाऱ्या महाकाल लोक लोकार्पण कार्यक्रमनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी राज्यात ५०० शिवालयांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    मुंबई : उज्जैन येथे होणाऱ्या महाकाल लोक लोकार्पण कार्यक्रमनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी राज्यात ५०० शिवालयांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार,आमदार आदी लोकप्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. ही माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि या कार्यक्रमाचे संयोजक मुरलीधर मोहोळ, भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी दिली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैन येथील महाकाल मंदिर भव्य कॉरिडॉरचे मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी लोकार्पण केले जात आहे. या कॉरिडॉरला ‘महाकाल लोक’ असे नाव देण्यात आले असून याचे काम दोन टप्प्यात केले जात असून ९०० मीटर परिसरात हे काम करण्यात आले आहे. वाराणसी येथील काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या पाठोपाठ महाकाल कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानिमित्त प्रदेश भाजपातर्फे राज्यातील ज्योर्तिलिंग ठिकाणी तसेच शिवालयांमध्ये उज्जैन येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे भंडारा येथे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे त्र्यंबकेश्वर येथे, सहकारमंत्री अतुल सावे हे घृष्णेश्वर येथे, आ.माधुरी मिसाळ या भीमाशंकर येथे, खा.प्रताप पाटील चिखलीकर हे औंढा नागनाथ येथे, खा. डॉ. प्रितम मुंडे या परळी वैजनाथ येथे या कार्यक्रमात सहभागी होतील. यावेळी मंदिरात पुजा-आरती होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. भाजपा लोकप्रतिनीधी आणि पदाधिकाऱ्यांसह, साधु-संत ही या कार्यक्रमात सहभागी होतील, असेही नमूद करण्यात आले आहे.