निमित्त आढावा बैठकीचे, तयारी विधानसभेची? खानापूर तालुक्यात गाेपीचंद पडळकरांनी घातले‌ लक्ष

खानापूर पंचायत समितीच्या सभागृहात दोन दिवसांपूर्वी भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आढावा बैठक घेतली.‌ तब्बल साडेचार तास चाललेल्या बैठकीत ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याबरोबर आगामी विधानसभा निवडणूकीसाठी लढवण्याच्या जय्यत तयारी सुरू असल्याचा प्रत्यय आला.‌

  विटा : खानापूर पंचायत समितीच्या सभागृहात दोन दिवसांपूर्वी भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आढावा बैठक घेतली.‌ तब्बल साडेचार तास चाललेल्या बैठकीत ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याबरोबर आगामी विधानसभा निवडणूकीसाठी लढवण्याच्या जय्यत तयारी सुरू असल्याचा प्रत्यय आला.‌

  पंधरादिवसांपुर्वी घाटमाथ्यावरील ऐनवाडी (ता. खानापूर) येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनास आमदार पडळकर आले असता आपण कोणत्याही परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यांचे पडसाद थेट मुंबईत उमटले‌. मंत्री उदय सामंत यांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली. खानापूर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर नेतृत्व करीत आहेत. त्यांचे काम चांगलं आहे. तेच पुन्हा निवडणूक लढतील. विजयी होतील, असा आशावाद व्यक्त केला. पडळकर काय म्हणतात, याकडे आम्ही लक्ष देत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, याकडे लक्ष देत असताे. मंत्री सामंत यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आमदार पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांनी लगेच आपल्या कार्यकर्त्यांना समवेत आमदार बाबर व माजी सदाशिव पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या भाळवणी परिसरात दौरा केला. भाळवणी, आळसंद, कमळापूर, कळंबी, जाधवनगर, खंबाळे या गावांना भेटी दिल्या. समस्या जाणून घेतल्या. कार्यकर्त्यांचा फिडबॅक घेत पंचायत समितीत आढावा बैठक घेतली.‌ आमदार पडळकरांनी त्यांच्या स्टाईलने अधिकाऱ्यांना धारेवर धरले.‌

  बऱ्याच दिवसांनी खानापूर पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक झाली. या बैठकीत आमदार पडळकर यांनी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे जागेवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करुन निपटारा लावला जात होता. लोकांच्या प्रश्नांची अडवणूक करणाऱ्यांना जागेवर झापले. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. बैठकीत आमदार पडळकर समर्थक प्रश्न विचारण्यात आघाडीवर होते.‌ बैठकीला पडळकर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  आ. बाबर यांना ठरणार डाेकादुखी
  पडळकर कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना स्पेस देत होते. स्वतः समस्या नोंद करून घेत होते. ग्रामस्थांना अप्रुप वाटत होते. लोकांच्या प्रश्नांसाठी पुन्हा आढावा बैठक घेवू, असे आश्वासन त्यांनी दिले. आमदार पडळकर यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठक ही आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आयोजित केल्याचे अधोरेखित झाले. पडळकरांची आढावा बैठक आगामी काळात आमदार बाबर यांना डोकेदुखी ठरणार आहे.

  आढावा बैठकीला बाबर समर्थकांची दांडी
  पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीला आमदार बाबर यांच्या समर्थकांनी दांडी मारल्याचे दिसून आले. विधानसभा िनवडणूक डाेळ्यासमाेर ठेऊन पडळकर सक्रीय झाल्याने बाबर गट सतर्क झाला आहे.