सातव्या दिवशी रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक सुरु ठेवण्यास परवानगी द्या- आमदार सुनिल शेळके

सातव्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक सुरु ठेवण्यास परवानगी देण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने द्यावा- आमदार सुनिल शेळके यांची मागणी.

    वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात गणेश विसर्जनासाठी सोमवार २५ सप्टेंबर २०२३ रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी रात्री १२.०० वा.पर्यंत परवानगी मिळावी अशा मागणीचे पत्र आमदार सुनिल शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

    मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव रुढी व परंपरेनुसार सात दिवसांचे असुन त्यानुसार सोमवार दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश विसर्जनाचे नियोजन करण्यात आलेले आहे.

    शहरातील मानाच्या मंडळांचे गणपती हे एका पाठोपाठ एक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असुन मंडळांच्या संख्येमुळे विसर्जनास मध्यरात्रीपर्यंत वेळ लागतो. आपल्या संदर्भिय आदेशान्वये गणेशोत्सव काळात पाचवा, सहावा, आठवा आणि नववा या दिवसांमध्ये रात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठीची मर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे.परंतु तळेगाव दाभाडे शहरातील गणेश विसर्जन हे सातव्या दिवशी म्हणजे सोमवार दि.२५ सप्टेंबर २०२३ रोजी आहे.तरी कृपया, तळेगाव दाभाडे ता.मावळ, जि.पुणे शहरातील गणेश विसर्जनासाठी ध्वनी प्रदुषण (नियम व नियंत्रण) नियम २००० मध्ये सोमवार दि.२५ सप्टेंबर २०२३ रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी मर्यादा शिथिल करण्यात येऊन रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.