One day district level training and seminar on pre-monsoon season preparation for fish farming and Pradhan Mantri Matsya Sampada Yojana.

अमरावती विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय वि.वा.शिखरे यांनी अध्यक्षस्थानावरुन संबोधतांना महा मत्स्य अभियान २५ मे ते ७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राबवित असून मत्स्य बीज उत्पादन संवर्धन व मत्स्य उत्पादन वाढीकरिता भर देत असल्याचे सांगितले.

    वाशीम : सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यवसाय विभाग वाशीम व कृषी विज्ञान केंद्र करडा यांच्या संयुक्त विघमाने महा मत्स्य अभियानांतर्गत मत्स्य शेती करिता मान्सुन हंगामाची पूर्व तयारी व प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या विषयावरील एक दिवशीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र व उपआयुक्त मत्स्य विभाग वाशीम यांच्या सयुक्त विद्यमाने २६ मे २०२२ रोजी विदाता प्रशिक्षण केंद्र वाशीम या ठिकाणी संपन्न झाले.

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय वि.बा.शिखरे हे होते. तर, उदघाटक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे हे उपस्थित होते. याप्रसंगी वाशीम नाबार्डचे सहायक महाप्रबंधक शंकर एस. कोकडवार, वाशीम जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष वामनराव अंभोरे आदी मान्यवर मंचावर विराजमान होते.

    अमरावती विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय वि.वा.शिखरे यांनी अध्यक्षस्थानावरुन संबोधतांना महा मत्स्य अभियान २५ मे ते ७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राबवित असून मत्स्य बिज उत्पादन संवर्धन व मत्स्य उत्पादन वाढीकरिता भर देत असल्याचे सांगितले. आगामी हंगामात मत्स्य शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करण्यासाठी मत्स्य शेतीचे शिफारशित तंत्राचे ठळक मुददे मांडले.
    यापुढे बोलतांना त्यांनी अभियानातून मत्स्यमारांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रबोधन कार्यक्रम घेत असून यामध्ये कृषी विज्ञान केंद्र करडाचे कामाचे व पुढाकाराची प्रशंसा केली. जिल्ह्यात जलस्त्रोत भरपूर असून मच्छीमार सहकारी संस्था ही मोठया प्रमाणात आहेत. अशा परिस्थीतीत महा मत्स्य अभियानात तसेच प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजनेत हिरीरीने भाग घ्यावा असे आवाहन केले. जिल्हयातील मत्स्य बीज उत्पादन केंद्र नसल्याने जिल्हयातील इतर मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेने मत्स्य बीज उत्पादन करावे असे आव्हान केले.

    कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.आर.एल.काळे यांनी जलाशयातील पिंजरा पदधतीने मत्स्यसंवर्धन, बायो फ्लोक व रास पदधतीचे तांत्रिक सादरीकरण करुन मत्स्य शेतीला बळकट करण्याकरिता संघटन करुन मत्स्य मुल्य वर्धन निर्यात वाढ, रोजगार निर्मिती तसेच सरासरी उत्पन्न वाढीसाठी पुढाकार घ्यावा, अशी आग्रही भुमिका मांडली. यापुढे बोलतांना त्यांनी ग्रामीण युवकांना नवनवीन तंत्र अवगत करण्याच्या हेतुने कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक सहकार्याची माहिती विषद केली.