मोडनिंब जवळ अपघातात एकाचा मृत्यू ; एक गंभीर जखमी  

ट्रक, दुचाकी आणि पिकअप धडकले

    टेंभूर्णी : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोडनिंब नजीक गुरुवारी सकाळी अकरा वाजता माल ट्रक, दुचाकी आणि पिकअप टेम्पोच्यामध्ये झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाले आहेत.
    याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूरहून कोंबडी खत घेऊन निघालेला ट्रक रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला  चुकविण्याच्या नादात रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकाच्या कडेला उभ्या असणाऱ्या खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पो जाऊन धडकला यात पिकअप चालक संजय मारुती गायकवाड (रा. अरण ता. माढा) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पंढरपूरकडे नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. तर सोबत असलेले औदुंबर सोमासे आणि दुचाकीस्वार हे गंभीर जखमी झाले असून, ट्रक चालक अपघात होताच फरार झाला आहे. घटनास्थळी मदतीसाठी अनेक लोक धाऊन आले होते. मालट्रकखाली दबलेल्या टेम्पोतून जखमी आणि मयत यांना काढण्यासाठी दोन जे.सी.बी ची मदत घेण्यात आली होती. घटनास्थळी राष्ट्रीय महामार्ग मदत केंद्र मोडनिंबचे पोलीस, वरवडे टोल नाका रुग्णवाहिका मदत पथक आणि नागरिक मदतीसाठी अथक परिश्रम घेत होते.