एक्सप्रेस वेवर विचित्र अपघातात एक ठार, दोन जखमी; खंडाळा घाटात अपघाताचे सत्र सुरुच

पुणे- मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली हद्दीत फुडमॉल जवळील तीव्र उतारावर एका ट्रेलरची चार वाहनांना धडक बसल्याने या अपघातात दोन ट्रक मार्गालगतच्या दरीत सुमारे शंभर फूट उंचीवरून खाली पडले. यामध्ये भांड्याची व कांद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि कंटेनरचा समावेश आहे.

    लोणावळा : पुणे- मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली हद्दीत फुडमॉल जवळील तीव्र उतारावर एका ट्रेलरची चार वाहनांना धडक बसल्याने या अपघातात दोन ट्रक मार्गालगतच्या दरीत सुमारे शंभर फूट उंचीवरून खाली पडले. यामध्ये भांड्याची व कांद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि कंटेनरचा समावेश आहे. या विचित्र अपघातात ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला तर इतर दोनजण जखमी झाले आहेत. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. हा अपघात बुधवारी पहाटे चारच्या सुमारास झाला आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील आडोशी बोगदा ते फुडमॉल दरम्यान अपघातांचे सत्र अद्याप सुरूच आहे.

    अजित जाधव (वय- ३२, रा. सांगली) अपघातात मृत्यू झालेल्या ट्रेलर चालकाचे नाव आहे. दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरचा टायर फुटून कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे पुढे जाणाऱ्या टेम्पोला पहिली धडक देत बसली. त्यानंतर डाव्या बाजूने जाणाऱ्या ट्रकला आणि त्यानंतर पुढे आणखी एका ट्रकला हा कंटेनर धडकला.

    ट्रक मार्गालगच्या दरीत कोसळला

    या विचित्र अपघातात एका ट्रकची केबीन सुटून ट्रक आणि दुसरा एक ट्रक मार्गालगच्या दरीत कोसळला. यात दोनजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट दस्तुरी महामार्ग व खोपोली पोलिसांसह देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत ट्रकच्या केबीनमध्ये अडकलेल्या एका जखमी चालकाला बाहेर काढून उपचारासाठी तत्काळ पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने मार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करीत आहेत.