चेक बाऊन्स न होण्याची काळजी घ्याच; ‘इथं’ एकाला झाली 3 महिन्यांची शिक्षा अन् पावणे दोन लाखांचा दंड

फायनान्स कंपनीला (Finance Company) कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्यासाठी दिलेले चेक बँकेत बाऊन्स (Cheque Bounce) झाल्याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी एका आरोपीला 3 महिन्यांचा कारावास व 1.70 लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

    गोंदिया : फायनान्स कंपनीला (Finance Company) कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्यासाठी दिलेले चेक बँकेत बाऊन्स (Cheque Bounce) झाल्याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी एका आरोपीला 3 महिन्यांचा कारावास व 1.70 लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

    प्रमोद लक्ष्मण वालके असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रमोद वालके याने श्रीराम सिटी युनियन फायनांस कंपनीच्या गोंदिया शाखेतून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाचे परतफेड करताना त्याच्याकडून कर्जाचे हप्ते वेळेवर व नियमित भरण्यात आले नाही. त्यामुळे त्याच्यावरील कर्ज थकीत झाले. दरम्यान, कर्जाची परतफेड करण्यासाठी आरोपीने कंपनीला 1 लाख 35 हजार 362 रुपयाचे धनादेश दिले. मात्र, धनादेश बँकेत दिले असता आरोपीच्या बँक खात्यात पर्याप्त रक्कम नसल्यामुळे ते बाऊन्स झाले.

    यावर फायनान्स कंपनीकडून आरोपीच्या विरोधात गोंदियाच्या न्यायालयात तक्रार नोंदविण्यात आली. यावर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. डी. वाघमारे यांनी साक्षिदार व वकीलांच्या युक्तीवादानंतर गुरुवारी आरोपीला 3 महिन्याचा कारावास व 1 लाख 70 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.