
नागपूर-हैदराबाद महामार्ग क्रमांक 44 वर हिंगणघाट येथील सगुणा कंपनीजवळ छोटी आर्वी शिवारात हा अपघात झाला आहे.
महामार्गावर खड्डे असणं काही नवीन बाब नाही आहे. हे खड्डे चूकवुन सुरक्षितरित्या गाडी चालवणं चालकासाठी आव्हानात्मक असतं. मात्र, अनेकदा रस्त्यावरील हे खड्डे चुकवताना बस किंवा ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याचं आपण अनेकदा पाहतो. आता वर्धा जिल्ह्यातून असाच एक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात हिंगणघाट येथे ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात (Wardha Accident News) झाला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 8 प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-हैदराबाद महामार्ग क्रमांक 44 वर हिंगणघाट येथील सगुणा कंपनीजवळ छोटी आर्वी शिवारात हा अपघात झाला आहे. या ट्रॅव्हल्समधून 28 प्रवासी प्रवास करत होते. हैदराबादहून रायपूरच्या दिशेनं निघालेली बस गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास हिंगणघाटमध्ये आली असता रस्त्यावरील खड्डा चुकवताना ट्रॅव्हल्स उलटली. प्रवाशी साखरझोपेत असतानाचा हा अपघात झाला. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत, तर या अपघातात ट्रॅव्हल्सचं मोठं नुकसान झालं आहे.