कणकवलीत रेल्‍वे तिकिटांचा काळाबाजार प्रकरणी एकजण ताब्यात

आयआरसीटीसी ॲपवरून रेल्‍वेची मर्यादेपेक्षा अधिक तिकीटे काढली, रेल्‍वे पोलिसांनी केली कारवाई

    कणकवली बाजारपेठेत येथील एका संशयिताला रेल्‍वे तिकीटांचा काळाबाजार केल्‍याप्रकरणी रेल्‍वे पोलिसांनी सोमवारी ताब्‍यात घेतले आहे. त्‍याने तिकिटांचा काळाबाजार केल्‍याप्रकरणी अधिक तपास रेल्वे पोलीस करीत आहेत. संशयित आरोपीला चौकशी अंती अटक करुन मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती रेल्‍वे पोलिसांकडून देण्यात आली.

    रेल्‍वे पोलिसांनी बाजारपेठेतील एका दुकानामध्ये कामाला असलेल्‍या तरूणाला सोमवारी दुपारी ताब्‍यात घेतले. त्‍या संशयित आरोपीने आयआरसीटीसी ॲपवरून रेल्‍वेची मर्यादेपेक्षा अधिक तिकीटे काढून ग्राहकांना विक्री केली होती. याबाबत आयआरसीटीसीकडून रेल्‍वे पोलिसांना कळविण्यात आले. त्‍यानंतर रेल्‍वे तिकीटे काढून देणाऱ्या त्या संशयित तरूणाची माहिती घेऊन त्‍याला ताब्यात घेतले आहे.

    रेल्‍वे तिकीट काळाबाजार प्रकरणी एकाला ताब्‍यात घेतल्याचे वृत्त समजल्‍यानंतर शहरातील इतर तिकीट विक्री एजंटांमध्ये खळबळ उडाली आहे. तिकीट बुकिंग साठी वापरला जाणारा मोबाईल, कॉम्प्युटर आदी साहित्‍य देखील रेल्वे पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. या संशयित अधिक चौकशी केली जात असल्‍याची माहिती रेल्‍वे पोलिसांकडून देण्यात आली.