अनैतिक संबंधातून एकाला मोटारीने चिरडलं; जागेवरच झाला मृत्यू

अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून मोटार अंगावर घालून शेजाऱ्याचा खून केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी महिलेसह दोन जणांना अटक केली.

  नारायणगाव : अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून मोटार अंगावर घालून शेजाऱ्याचा खून केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी महिलेसह दोन जणांना अटक केली. साबीर मोहंमद शफी ब्यापारी (वय ४५, रा. पणसुंबा पेठ, जुन्नर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी अभिजित सोनवणे (वय २८, रा. डिंगोरे, ता. जुन्नर) व सहआरोपी जेबा इरफान फकीर (वय ३२, पणसुंबा पेठ) यांना अटक केली आहे.

  पोलिस उपनिरीक्षक सनील धनवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत साबीर मोहंमद शफी ब्यापारी व जेबा इरफान फकीर हे दोघेही विवाहित असून, जुन्नर येथे शेजारी राहण्यास आहेत. साबीर हा जेबा हिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. जेबा ही कांदळी वसाहतीत एका कंपनीत कामास होती. नोकरीनिमित्त ती रोज जुन्नर ते कांदळी ये- जा करत असे.

  अभिजित सोनवणे हा तालुक्यात शेतजमीन मोजणीचे काम करतो. प्रवासादरम्यान त्यांची ओळख झाली. या माध्यमातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ही माहिती साबीर मोहंमद शफी ब्यापारी याला होती. त्यावरून साबीर व अभिजित यांच्यात वाद निर्माण झाला होता. रमजान सणासाठी गुरुवारी अभिजित हा जेबा हिच्या घरी आला होता. या वेळी, ‘तू येथे का आलास?’ असा जाब साबीर याने अभिजित याला विचारला. त्यावरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला होता.

  दरम्यान, शुक्रवारी सकाळी जेबा ही कांदळी येथे जाण्यासाठी जुन्नर येथून बसने निघाली होती. साबीर याने तिचा पाठलाग सुरु केला. याबाबतची माहिती जेबा हिने मोबाईलवरून अभिजित याला दिली. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साबीर हा नारायणगाव येथील पुणे- नाशिक महामार्गालगत असलेल्या अयोध्या हॉटेल येथे उभा होता. त्यावेळी अभिजित याने साबीर याच्या अंगावर मोटार घालून त्याला चिरडले. या घटनेत साबीर याचा जागीच मृत्यू झाला.

  या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. शुक्रवारी सायंकाळी मुस्लिम समाजाचा मोठा जनसमुदाय नारायणगाव येथील पोलिस पोलिस ठाण्यात जमा झाला होता. आरोपीला अटक करण्याची मागणी मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी केली. पोलिसांनी पिंपळवंडी येथून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर महिलेला ताब्यात घेतले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहेत.

  गुन्ह्याची कबुली

  आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, संगनमताने हा गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी अभिजित सोनवणे व सह आरोपी जेबा इरफान फकीर या दोघांनाही अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार करत आहेत.