गेवराई तालुक्यात ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट; 17 वर्षीय तरूण वीज पडून ठार

तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, विजांचा कडकडाट सुरू आहे. तालुक्यातील पाथरवाला बु. जवळील बनगर वस्ती शिवारात ऊसाला पाणी देत असताना एका 17 वर्षीय तरूण विद्यार्थ्यांचा विज अंगावर पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली आहे.

    गेवराई : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, विजांचा कडकडाट सुरू आहे. तालुक्यातील पाथरवाला बु. जवळील बनगर वस्ती शिवारात ऊसाला पाणी देत असताना एका 17 वर्षीय तरूण विद्यार्थ्यांचा विज अंगावर पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली आहे.

    श्रीराम भाऊसाहेब ठोंबरे असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. गेवराई तालुक्यातील पाथरवाला बु. येथील रहिवासी असलेला श्रीराम भाऊसाहेब ठोंबरे हा यावर्षी इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होता. त्यांची पाथरवाला जवळील गुळज शिवारात जमीन असून, दोन दिवसांपासून नवीन ऊसाची लागवड सुरू असल्याने पाणी देत असताना तालुक्यातील विविध ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊन विजेचा कडकडाट सुरू आहे.

    दरम्यान, शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास श्रीराम भाऊसाहेब ठोंबरे याच्या अंगावर विज पडली. परिसरातील नागरिकांनी त्यास गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी श्रीराम यास मयत घोषित केले. रविवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.