
काल (मंगळवारी,२६) पणनमंत्र्यांसोबत व उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सह्याद्रीवरील बैठकीतून कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळं आता २९ सप्टेंबरच्या बैठकीकडे शेतकरी व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नाशिक – मागील महिन्यात कांदा निर्यातीवरील शुल्क वाढविल्यामुळं कांदा व्यापाऱ्यांनी तसेच शेतकरी संघटनांनी संप पुकारत आंदोलन केले होते. यावर सरकारने तोडगा काढत, हे आंदोलन थांबवले असताना, आता पुन्हा एकदा कांद्या व्यापाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. गेल्या ८ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत. या ८ दिवसांमध्ये सुमारे ७ ते ८ लाख क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची आवक ठप्प झाली आहे. या आवकेच्या रूपाने सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल खोळंबली आहे. त्यामुळं शेतकरी तसेच व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान काल (मंगळवारी,२६) पणनमंत्र्यांसोबत व उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सह्याद्रीवरील बैठकीतून कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळं आता २९ सप्टेंबरच्या बैठकीकडे शेतकरी व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (onion auction closed on eight day too yesterday meeting on sahyadri was fruitless will a solution be found in the september twenty nine meeting)
सह्याद्रीवरील बैठक निष्फळ
…तर थेट दिल्लीत ठिय्या आंदोलनाचा इशारा
कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क हटविण्यात यावे आणि नाफेड-एनसीसीएफचा कांदा बंद केला जावा, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनकडून हा बंद पुकारण्यात आला आहे. दुसरीकडे कांदा व्यापारीही आक्रमक झाले असून, पुढील बैठकीतून तोडगा निघाला नाहीतर, त्यांनी थेट दिल्लीत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. बंदच्या कालावधीत पालकमंत्री दादा भुसे, पणनमंत्री अब्दुल सतार आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या वतीने पुढाकार घेऊन तोडगा काढण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. तर कालची बैठक देखील फोल ठरली आहे. त्यामुळं दिल्लीत २९ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीतून तरी तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.