नाशिकमध्ये उद्यापासून कांदा लिलाव सुरू होणार; केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार यांची मध्यस्थी यशस्वी

केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात (Onion Export) शुल्क लावल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी आक्रमक झाले असून, कांद्याचा बेमुदत लिलाव बंद होता. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव दोन दिवसांपासून ठप्प होता. यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही मोठं नुकसान सोसावं लागतं होतं.

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात (Onion Export) शुल्क लावल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी आक्रमक झाले असून, कांद्याचा बेमुदत लिलाव बंद होता. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव दोन दिवसांपासून ठप्प होता. यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही मोठं नुकसान सोसावं लागतं होतं. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी बैठक बोलावली होती. ही बैठक यशस्वी झाली असून, उद्यापासून नाशिकमध्ये कांदा लिलाव सुरू होणार आहे.

    कांदा निर्यातीवरील 40 टक्के शुल्क केंद्र सरकार मागे घेत नाही, तोपर्यंत कांद्याचा लिलाव सुरू करणार नाही, अशी भूमिका कांदा व्यापाऱ्यांनी घेतली होती. मात्र, आज या भूमिकेपासून घुमजाव करत उद्यापासून कांदा लिलाव सुरू करणार असल्याची माहिती नाशिकच्या कांदा व्यापारी असोसिएशनने दिली आहे.

    कांदा व्यापारी असोसिएशन, नाशिकची आज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासोबत बैठक पार पाडली. या बैठकीनंतर कांदा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी खंडू देवरे यांनी आपण आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

    व्यापाऱ्यांकडून अडवणूक नाही

    कांदा व्यापारी असोसिएशनचे देवरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कांद्यावर निर्यात शुल्क लावण्यासारखा कोणताही निर्णय घेण्याआधी व्यापाऱ्यांचा विचार करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. व्यापारी कधीही शेतकऱ्यांची अडवणूक करत नाही. व्यापाऱ्यांनी मागील दोन दिवस कांदा लिलाव बंद केला असला तरी शेतकऱ्यांकडून आम्ही कांदा खरेदी करत आहोत.