निर्यात शुल्काचा कांद्याला फटका, दर घसरले; प्रतिकिलोला ‘इतके’ रुपये मिळतोय भाव

निर्यात बंदी उठविल्यानंतर कांद्याच्या भावात निर्माण झालेल्या तेजीला निर्यात शुल्क वाढीमुळे ब्रेक लागला आहे. पंचवीस रुपयांपर्यंत पोहचलेला प्रति किलोचा भाव तेरा ते सतरा रुपयांपर्यंत खाली आला आहे.

  पुणे : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने भारताच्या काही मित्र राष्ट्रांना कांदा पाठवण्याची परवानगी दिली होती. आता केंद्राने निर्यातबंदी उठवली आहे. निर्यात बंदी उठताच कांद्याचे भाव वाढले हाेते. निर्यात बंदी उठविल्यानंतर कांद्याच्या भावात निर्माण झालेल्या तेजीला निर्यात शुल्क वाढीमुळे ब्रेक लागला आहे. पंचवीस रुपयांपर्यंत पोहचलेला प्रति किलोचा भाव तेरा ते सतरा रुपयांपर्यंत खाली आला आहे.
  मागील आठवड्यात मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला १५० ते १८० रुपये भाव मिळत होता. तो रविवारी १८० ते २३० रुपयापर्यंत पोहोचला. यामुळे किरकोळ बाजारात प्रति किलाे २५ ते ३० रुपये भावाने कांद्याची विक्री होत आहे. येथील बाजारात रविवारी ८० ट्रक कांद्याची आवक झाली होती.
  केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी मागे घेतल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली हाेती. परंतु निर्यात शुल्कातही वाढ झाल्याचा परीणाम ही झाला आहे, निर्यातशुल्क जास्त असल्याने परदेशातील आयातदारांकडून अपेक्षित मागणी कमी झाली. त्याचा परीणाम निर्यातीवर झाला. निर्यातदारांकडून मागणी कमी झाल्याने भावांत पुन्हा घट झाली आहे. घाऊक बाजारात प्रति दहा किलाेला एकशे तीस ते एकशे एैंशी इतका भाव मिळत आहे. घाऊक बाजारात भाव उतरले असले तरी किरकाेळ बाजारात अद्याप भाव टिकून राहीला आहे.
  घाऊक बाजारातील भाव कमी
  यासंदर्भात व्यापारी राजेंद्र ऊर्फ आप्पा काेरपे म्हणाले, निर्यात बंदी उठविली गेल्यानंतर निर्यातदारांकडून खरेदी हाेऊ लागली हाेती. मागणीत वाढ झाल्याने गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात किलोमागे ४ ते ५ रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला हाेता. परंतु आता निर्यातशुल्क वाढल्याने पुन्हा मागणीत पन्नास टक्क्यांनी घट झाली आहे. स्वाभाविकपणे घाऊक बाजारातील भाव कमी झाले आहेत.
  भाव नसल्याने साठवणुकीकडे कल
  सध्या गरवी कांद्याचा हंगाम सुरू आहे. गावरान कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहे. अपेक्षित प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी आणि व्यापारी मालाचा जास्त प्रमाणात साठा करत आहेत.