आंबळेतील कांदा सडला; पंचवीस लाखांचे नुकसान

अतिवृष्टीत कांद्याचे नुकसान होऊन तो सडल्यामुळे  जवळपास २५ शेतकऱ्यांचे २५ लाखाचे नुकसान झाले असल्याचे ग्रामपंचायतीचे सदस्य व शेतकरी अजित जगताप यांनी सांगितले.

  माळशिरस : आंबळे ( ता. पुरंदर ) येथील मुंबई वस्ती येथे शेतकऱ्यांनी साधारण ३० एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली होती. हा कांदा तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कांदा चाळीत ठेवला. त्यानंतर बाजार भाव वाढतील याची वाट पाहत असताना अतिवृष्टीत कांद्याचे नुकसान होऊन तो सडल्यामुळे  जवळपास २५ शेतकऱ्यांचे २५ लाखाचे नुकसान झाले असल्याचे ग्रामपंचायतीचे सदस्य व शेतकरी अजित जगताप यांनी सांगितले.

  मुंबईवस्ती येथे साधारण २५ शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती. परंतु या अगोदर अति उष्णता व नंतर अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीला या शेतकऱ्यांचे कांदा पिक बळी पडले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून आपल्याला नुकसान भरपाई मिळावी. यासाठी त्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना तातडीने पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी म्हणून पत्र देणार आहेत.

  नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल

  या शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये कांदा रोपे टाकली. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये याची लागवड केली. त्यानंतर मार्चमध्ये कांदा काढणीला आला. कांदा काढून झाल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या कांदा चाळीत सुरक्षित ठेवला. पण सातत्याच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आज शेतकरी हवालदिल झाला आहे.

  कांदा बाजारात नेत असताना याचे वर्गीकरण केले असता ७० टक्के कांदा सडलेला टाकून द्यावा लागत आहे. यामुळे या मुंबईवस्तीवरील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

  - सुभाष बबन जगताप, कांदा उत्पादक

  सध्या कांदा पिकाला बाजार नसल्यामुळे कांदा जाग्यावरच पडू आहे. बाजार भाव वाढेल या हिशोबाने शेतकऱ्यांनी तो कांदा चाळीत ठेवला आहे. परंतु बाजार वाढण्याची सध्या कुठेच खात्री वाटत नसल्याने नक्की काय निर्णय घ्यायचा, . हे आम्हाला सुचत नाही.

  --- दिलीप ज्ञानोबा जगताप, कांदा उत्पादक

  यावेळी अजित जगताप, शिवाजी जगताप, अजित रमेश जगताप, कांताराम जगताप, दिलीप जगताप, शैलेश जगताप, संजय जगताप, सुनील जगताप, सुभाष जगताप, विलास जगताप, अंकुश जगताप, दिलीप पंढरीनाथ जगताप, बाळासो जगताप, अशोक जगताप, रामचंद्र जगताप आदी शेतकऱ्यांनी आपली व्यथा नवराष्ट्रशी बोलताना मांडल्या.