कांद्याचे दर घसरले, मार्केट यार्डात आवक कमी; नासक्या कांद्यामुळे शेतकऱ्यांना फटका

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यातील एका शेतकऱ्याला २४ पोते कांदा विक्री करून फक्त ५५७ रुपये मिळाले होते. सोलापूर मार्केट यार्डात कांद्याची आवक देखील कमी झाली आहे.

    सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यातील एका शेतकऱ्याला २४ पोते कांदा विक्री करून फक्त ५५७ रुपये मिळाले होते. सोलापूर मार्केट यार्डात कांद्याची आवक देखील कमी झाली आहे. व्यापाऱ्यांशी संवाद साधून खरी परिस्थिती जाणून घेतली असता, नासलेला कांदा विक्रीसाठी आल्याने कांद्याला भाव मिळत नसल्याची माहिती मिळाली.

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अजहर बागवान यांनी माहिती देताना सांगितलं की, उत्तम दर्जाच्या कांद्याला मागणी आहे, मात्र शेतकरी नासका कांदा विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाहीये. उत्तम दर्जाच्या कांद्याला आजही २० ते २५ रुपये प्रतिकिलो भाव मिळतो. मात्र उसात लागवड केलेला कांदा आणला जात आहे. उसात लागवड केलेला कांदा हा लवकर खराब होतो. तसंच सोलापूरच्या वाढत्या तापमानामुळे कांद्याच्या पाकिटात पाणी सुटत आहे आणि दुर्गंधी येत आहे. नासलेला कांदा आणि दुर्गंधीयुक्त कांद्याला भाव मिळत नाही. सोलापूर मार्केट यार्डात येणारे परराज्यातील अन्य व्यापारी देखील हा कांदा खरेदी करत नाहीत. नासलेला कांदा परराज्यात पाठवला तर तेथील व्यापारी नासक्या कांद्याचे पैसे देखील देत नाही, अशी खंत सोलापूर मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

    नासलेल्या कांद्यामुळे दुर्गंधी

    सोलापूर मार्केट यार्डात नासलेल्या कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी यार्डातच जागोजागी कांदा फेकला आहे. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची भयंकर दुर्गंधी पसरली आहे. वाढत्या तापमानाचा फटका शेतकऱ्यांच्या कांद्याला बसत आहे. सोलापुरात दोन महिन्यांपासून ४० अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान आहे. त्यामुळे कांद्याला पाणी सुटत आहे. पाणी सुटलेला कांदा कुणीही खरेदी करत नाही त्यामुळे शेतकरी परगावारून येऊन व्यापाऱ्याच्या लिलाव पद्धतीवर खापर फोडत आहे.

    सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी अजहर बागवान यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. चांगला आणि उत्तम दर्जाचा कांदा आणा आम्ही योग्य भाव देऊ. उसात लागवड केलेला कांदा लवकर खराब होत आहे. सोलापूर मार्केट यार्डातील कांदा व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, ओडिशा या राज्यात निर्यात करतात. या राज्यात कांदा पाठवताना जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. पंधरा दिवसांत कांदा खराब होत आहे आणि तेथील व्यापारी कांद्याची रोकड देखील देत नाही, त्यामुळे खराब कांद्याला सोलापूर मार्केट यार्डात भाव मिळत नाही.