कांद्याचा प्रश्न मिटला; आजपासून लिलाव सुरु होणार, कालच्या बैठकीतून तोडगा निघाला, बैठकीत काय झाले?

कांदा व्यापारी असोसिएशन आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासोबत काल बैठक पार पाडली. बुधवारी केंद्रीय मंत्री आणि दिंडोरीच्या खासदार भारती पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला असून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये गुरुवार पासून व्यवहार सुरळीत सुरू होणार आहेत.

    नाशिक : शनिवारी केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात (Onion Export) शुल्क लावल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी आक्रमक झाले होते. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प होता. त्यामुळं मागील चार दिवसांपासून कांद्याचा लिलाव आणि विक्री बंद ठेवण्यात आली होती. तसेच शुल्कवाढीच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले. कांद्याचा बेमुदत लिलाव बंद होता. यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही मोठं नुकसान सोसावं लागतं होतं. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी काल (बुधवारी) बैठक घेतली. ही बैठक यशस्वी झाली असून, आजपासून नाशिकमध्ये कांदा लिलाव सुरू होणार आहे. (Onion problem solved; Auction will start from today, settlement in yesterday’s meeting, what happened in the meeting)

    आजपासून लिलाव सुरु…

    कांदा निर्यातीवरील 40 टक्के शुल्क केंद्र सरकार मागे घेत नाही, तोपर्यंत कांद्याचा लिलाव सुरू करणार नाही, अशी भूमिका कांदा व्यापाऱ्यांनी घेतली होती. मात्र, आज या भूमिकेपासून घुमजाव करत आजपासून कांदा लिलाव सुरू करणार असल्याची माहिती नाशिकच्या कांदा व्यापारी असोसिएशनने दिली आहे. कांदा व्यापारी असोसिएशन आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासोबत काल बैठक पार पाडली. बुधवारी केंद्रीय मंत्री आणि दिंडोरीच्या खासदार भारती पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला असून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये गुरुवार पासून व्यवहार सुरळीत सुरू होणार आहेत. या बैठकीनंतर कांदा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी खंडू देवरे यांनी आपण आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

    व्यापाऱ्यांकडून अडवणूक नाही

    कांदा व्यापारी असोसिएशनचे देवरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कांद्यावर निर्यात शुल्क लावण्यासारखा कोणताही निर्णय घेण्याआधी व्यापाऱ्यांचा विचार करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. व्यापारी कधीही शेतकऱ्यांची अडवणूक करत नाही. व्यापाऱ्यांनी मागील दोन दिवस कांदा लिलाव बंद केला असला तरी शेतकऱ्यांकडून आम्ही कांदा खरेदी करत आहोत.