आयपीएलवर ऑनलाइन सट्टा; सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त

'आयपीएल'च्या सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील १० जणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी छापा मारत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दहाही जणांना अटक केली.

    पुणे : ‘आयपीएल’च्या सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील १० जणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी छापा मारत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दहाही जणांना अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि १३) रात्री कोथरुड भागातील उच्चभ्रू अशा उजवी भुसार कॉलनी परिसरात करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    मुकेशकुमार शैलेंद्रप्रसाद साहू (वय २४) , देवेंद्र कमलेशकुमार यादव (वय २१), राहूलकुमार गणेश यादव, रोहितकुमार गणेश यादव (वय २६), दुष्यंत कोमलसिंह सोनकर (वय २३), संदिप राजु मेश्राम (वय २१), आखिलेश रुपाराम ठाकूर (वय २४), मोहम्मद ममनुन ईस्माईल सौदागर (वय ३२), अमित कैलास शेंडगे (वय ३१, सर्व रा. छत्तीसगड) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. याबाबत सहायक पोलीस फौजदार प्रविण वसंत ढमाळ (वय ५३) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक एक चे अधिकारी व कर्मचारी कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पथकाला माहिती मिळाली की, उजवी भुसारी कॉलनीतील पटेल टेरेस या बिल्डींगमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. एस/5 येथे क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा खेळत व खेळविला जात आहे. मिळालेल्या माहिती खात्री करुन पथकाने याठिकाणी छापा टाकला.

    त्यावेळी आरोपी त्यांच्या मोबाईलमध्ये वेबसाईटचा वापर करुन ऑनलाईन जुगार खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले. आरोपी स्वत:च्या फायद्याकरीता लोकांची फसवणूक करुन ऑनलाईन क्रिकेट व इतर सट्टा खेळत व खेळवित असताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपींकडून मोबाईल, लॅपटॉप असा एकूण 2 लाख 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करीत आहेत