mumbai crime

पॅन कार्ड (Pan Card) अपडेट करण्याच्या बहाण्याने मुंबईतील ४७ वर्षीय इसमाची फसवणूक झाल्याची माहिती मिळाली आहे. रोहित घुस्ते असं फसवणूक झालेल्या इसमाचं नाव आहे.

    मुंबई: सध्या सायबर गुन्ह्यांचं प्रमाण खूप (Cyber Crime) वाढले आहे. अनेक जण ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करणाऱ्यांच्या बोलण्यामुळे फसतात. असाच प्रकार मुंबईत (Mumbai) घडला आहे. पॅन कार्ड (Pan Card) अपडेट करण्याच्या बहाण्याने मुंबईतील ४७ वर्षीय इसमाची फसवणूक झाल्याची माहिती मिळाली आहे. रोहित घुस्ते असं फसवणूक झालेल्या इसमाचं नाव आहे.

    आरोपींनी या इसमाच्या बँक खात्यातून एक लाख ४० हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी मुंबईतील आंबोली पोलिसांनी गुजरातमधून चार जणांना अटक केली आहे.

    तक्रारदार रोहित घुस्ते यांच्या माहितीनुसार २४ मार्च रोजी त्यांना अनोळखी मोबाईल फोनवरुन त्यांचे पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी कॉल आला होता. पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी घुस्ते यांच्या मोबाईल क्रमांकावर आरोपींनी एक लिंक पाठवली होती. लिंक मिळाल्यावर रोहित घुस्ते यांनी त्यावर क्लिक केलं. या लिंकच्या माध्यमातून आरोपींनी त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ४० हजार रुपये लुटले.

    या प्रकरणी रोहित घुस्ते यांनी आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यानुसार  गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपासामध्ये आरोपी  गुजरातमधील सूरत भागातले असल्याचं निष्पन्न झालं. पोलीस पथकाने प्राप्त तांत्रिक माहितीच्या आधारावर सूरतमध्ये आरोपीचा शोध घेतला. यात आंतरराज्यीय टोळीचे चार आरोपी विपुल बोघरा, प्रदीप रंगानी, आशिष बोदरा आणि जेमीश विरानी यांना अटक करण्यात आली आहे.

    दरम्यान, अटक केलेल्या आरोपींकडून एकूण १५३ क्रेडिट कार्ड, ४ मोबाईल फोन आणि १ टॅब जप्त करण्यात आला आहे.