एक मेसेज आला अन् अर्ध्या तासातच झालं होत्याचं नव्हतं; पुण्यातील वृद्ध महिलेला साडेनऊ लाखांचा गंडा

ऑनलाईन व्यवहारांमध्ये (Online Transaction) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. सध्या बहुतांश बँक खातेदार व्यवहार करताना गुगल पे (Google Pay), फोन पे (PhonePe) यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. पण हे करत असताना सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होत असल्याच्या घटनाही जास्त आहे.

    मुंबई : ऑनलाईन व्यवहारांमध्ये (Online Transaction) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. सध्या बहुतांश बँक खातेदार व्यवहार करताना गुगल पे (Google Pay), फोन पे (PhonePe) यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. पण हे करत असताना सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होत असल्याच्या घटनाही जास्त आहे. अशीच एक घटना मुंबईत घडली. पुण्यातील एका ज्येष्ठ महिलेला वीज बिलाच्या नावाने तब्बल साडे नऊ लाखांना गंडा (Online Fraud) घालण्यात आल्याचा प्रकार घडला.

    उषा श्रीकांत असे 76 वर्षीय वृद्ध महिलेचे नाव आहे. उषा या मुंबईतील लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी 5 मे रोजी मुंबईत आल्या. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वीज बिल न भरल्याने विद्युत पुरवठा खंडित होणार असल्याबाबत मेसेज त्यांना मोबाईलवर आला. वीज बिल भरण्यासाठी त्यांना एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यांनीही मिळालेल्या मेसेजनुसार, संबंधित क्रमांकावर कॉल केला. त्यानुसार, संबंधित महावितरण अॅप डाउनलोड करण्यास सांगून त्यामध्ये 100 रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी पैसे भरले आणि त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच खात्यातून तब्बल 9 लाख 48 हजार रुपये वजा झाल्याचे मेसेज आला.

    खात्यातून पैसे गेल्याने थेट पोलिसांकडे धाव

    उषा श्रीकांत यांना फोनवरून जे काही सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी केले. पहिल्यांदा त्यांच्या खात्यातून 100 रूपये भरण्यास सांगण्यात आले. मात्र, ही रक्कम भरल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासांतच त्यांच्या खात्यातून 7 व्यवहार झाल्याचे दिसले. त्यानुसार, त्यांना मेसेजही आला आणि त्यातून तब्बल साडे नऊ लाख गेल्याचे दिसले. हे पाहून त्यांना धक्काच बसला आणि त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.