ताडोबा जंगल सफारीच्या नावाखाली ऑनलाईन गंडा; तब्बल 12 कोटींची फसवणूक

ताडोबा जंगल सफारीसाठी (Tadoba Jungle Safari) ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली सरकारची 12 कोटींहून अधिकची फसवणूक केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

    चंद्रपूर : ताडोबा जंगल सफारीसाठी (Tadoba Jungle Safari) ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली सरकारची 12 कोटींहून अधिकची फसवणूक केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रामनगर पोलिसांनी अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन आरोपींविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्यापही त्यांना अटक करण्यात आली नाही. दोन्ही आरोपी शहरातील उच्चभ्रू कुटुंबातील असल्याची माहिती दिली जात आहे.

    ताडोबा जंगल सफारीसाठी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन नावाच्या कंपनीमध्ये ताडोबा अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक यांच्यासोबत करार करण्यात आला. ही कंपनी चंद्रपूर येथील गुरुद्वारा रोड येथील अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन भावांची आहे. या करारानुसार, ही कंपनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कमिशनच्या आधारावर ऑनलाइन सफारी बुकिंग करू शकते.

    2020 ते 2023 या कालावधीत या कंपनीला केलेल्या बुकिंग अंतर्गत 22 कोटी 20 लाख एवढी रक्कम ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रमोशन फाउंडेशनकडे जमा करायची होती. मात्र, या कंपनीने केवळ 10 कोटी जमा केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. विशेष म्हणजे कंपनीने ताडोबा व्यवस्थापनाला 12 कोटी 15 लाख 50 हजारांनी गंडा घातला आहे.