
ऑनलाईन दंड पडल्यानंतर एक फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला असून, रिक्षावर बनावट क्रमांक टाकून तो रिक्षा चालवित असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणात आता एकाला अटक केली आहे.
पुणे : ऑनलाईन दंड पडल्यानंतर एक फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला असून, रिक्षावर बनावट क्रमांक टाकून तो रिक्षा चालवित असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणात आता एकाला अटक केली आहे.
श्रीकांत मोहन वेळेकर (३६, रा. महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत राजेंद्र चंद्रकांत बोराटे (वय ५०, रा. पिंपरे खुर्द, निरा) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
राजेंद्र बोराटे हे रिक्षा चालक आहेत. त्यांची रिक्षा (क्रमांक. एमएच.१२.एक्यु.१०८०) ते सांगवी व पिंपळे खुर्द परिसरात चालवितात. दरम्यान, त्यांना सकाळीच एकादिवशी त्यांच्या मोबाईलवर रिक्षाचा १ हजार रूपये दंड पडल्याचा मॅसेज आला. मॅसेज पाहिल्यानतंर त्यांना विना लायसन्स व विना गणवेश रिक्षा चालवत असल्याचा तो दंड होता. परंतु, आपण गाडी याठिकाणी नेलीच नव्हती, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ याची माहिती वाहतूक पोलिसांकडे धाव घेतली. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी पाहणी केली असता त्यांच्या रिक्षाचा बनावट क्रमांक टाकून रिक्षा चालवत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तत्काळ पोलिसांनी गुन्हा नोंद करत त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.