पालिकेद्वारे पाळीव प्राण्यांसाठी मिळणार ऑनलाईन परवाना; आयुक्त राजेश पाटील यांची माहिती

श्वान परवान्यासाठी महापालिकेने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिक आणि पाळीव प्राणी मालक यांना दिनांक ४ ऑगस्ट २०२२ पासून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन श्वान परवाना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

    पिंपरी : श्वान परवान्यासाठी महापालिकेने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिक आणि पाळीव प्राणी मालक यांना दिनांक ४ ऑगस्ट २०२२ पासून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन श्वान परवाना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

    महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांचे सुलभीकरण करून त्या जलदगतीने नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविला आहे. ऑनलाईन पध्दतीने विविध सेवा देण्याकडे महापालिकेचा कल असून, नागरिकांच्या वेळेत बचत व्हावी, या उददेशाने या सेवा परिणामकारक ठरत आहे. महापालिकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत पाळीव प्राण्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी डॉगशेल्टर सूरू करण्यात आले आहेत.

    परवाना प्राप्त केल्याशिवाय श्वान पाळू नये, अशी शासन नियमात तरतुद आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत श्वान मालकास श्वान परवाना दिला जातो. यामध्ये श्वान मालकास प्रत्यक्ष कार्यालयात येऊन संपुर्ण प्रक्रिया करुन घ्यावी लागते. सद्यस्थितीत केवळ ४५० इतक्या पाळीव श्वानांचे विभागातुन श्वान मालकांनी परवाने घेतले आहेत. श्वान परवाना प्राप्त करण्याचे प्रमाण कमी असून, त्यास परवाना प्रकिया अधिक सुलभ करुन दिल्यास श्वान मालकांचा प्रतिसाद वाढण्यास मदत होणार आहे.

    ऑनलाईन परवान्याची कायदेशीर मुदत परवाना प्राप्त झाल्यापासून एक वर्षापुरती असेल. दरवर्षी परवान्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक राहील. वेळोवेळी ठरविलेले शुल्क अदा केल्यानंतर अटी व शर्तीस अधीन राहुन परवाना देण्यात येईल. परवाना धारकाने प्राप्त परवाना सोबत बाळगणे आवश्यक असून प्राधिकृत अधिकाऱ्याने मागणी करताच सादर करणे आवश्यक राहील. ज्या श्वानास परवाना दिलेला आहे, तो श्वान पिसाळलेला अथवा तसा संशय असल्यास परवाना धारकाने सदर बाब पशुवैद्यकीय विभागास तात्काळ लक्षात आणून देणे गरजेचे आहे.

    श्वानास रेबीज लसीकरण करणे बंधनकारक राहील. परवाना धारकाने सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर श्वानास मोकळे सोडता कामा नये. तसेच सदर श्वानापासून इतरांना दुखापत होण्याची शक्यता परवाना धारकास वाटत असल्यास सदर श्वानास त्याने मुस्के घालण्याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक आरोग्याचे व पर्यावरणाचे दृष्टीने आपल्या श्वानामुळे कुठल्याही प्रकारची घाण निर्माण होणार नाही, याची परवाना धारकाने दक्षता घ्यावी, अन्यथा श्वान मालकास पाचशे रूपये इतका दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीचे आणि रहदारीचे ठिकाणी, सार्वजनिक बागेमध्ये श्वान साखळी व्यतिरिक्त (मोकळा) सोडू नये. तसेच नागरिकांना भुंकण्याचा किंवा अंगावर धावून जाण्याचा, चावण्याचा उपद्रव होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सह कुत्र्यावरील कर उपविधी यामधील नियम व तरतुदी परवाना धारकांवर बंधनकारक राहतील.