महा-रेरा नोंदणीकृत प्रकल्पांनाच स्थान द्यावे अन्यथा आंदोलन, रियल इस्टेट उद्योग सेनेचा बिल्डर असोसियेशनला आंदोलनाचा इशारा

    नवी मुंबई : क्रेडाईतर्फे वाशीमध्ये रियल इस्टेट प्रदर्शन भरवले जाणार आहे. या प्रदर्शनात महारेरा मध्ये नोंदणीकृत असलेल्या विकासकांनाच प्रदर्शनात आपले स्टॉल लावण्यास संधी द्यावी. जर नोंदणीकृत नसलेले विकासक दिसल्यास महाराष्ट्र बांधकाम व रियल इस्टेट उद्योग सेनेचे प्रशांत अनगुडे यांनी थेट आंदोलन करून त्याने आत्मदहन करण्याचा इशारा प्रदर्शन भरवणाऱ्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई या विकासकांच्या संघटनेला पत्र देऊन दिला आहे.

    ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून शासनाने महरेरा कायद्याची निर्मिती केली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. विकासकांच्या फसवणुकीमुळे फसलेल्या ग्राहकांना न्याय मागण्यासाठी हक्काचे व्यासपीठ महारेराच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. असे असताना देखील अनेक विकासक हे महारेरामध्ये नोंदणी न करता गृह प्रकल्प उभारत आहेत. त्यात सामान्य नागरीक आयुष्यात कमावलेली पुंजी गुंतवत आहेत. मात्र अशा नियमबाह्य गृहप्रकल्प उभारणाऱ्या विकासकांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याची अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो यामुळे नवी मुंबई, पनवेल, उरणसह खोपोली, कर्जत, नेरळ, खालापूर, रसायनी, पनवेल ग्रामीण भागांना अतिशय महत्व आले आहे. या भागात विकासक आपले प्रकल्प उभारत आहेत. तिसरी मुंबई उदयास येऊ लागली आहे. अशात सध्या नवी मुंबईत घर घेणे अवक्याबाहेर गेल्याने ग्राहक पनवेल व त्यापुढे होत असलेल्या गृह प्रकल्पांकडे आकर्षित होऊ लागले आहेत. मात्र त्यात ग्राहकांची फसवणूक देखील होण्याची शक्यता वाढली आहे.अशा ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून महाराष्ट्र बांधकाम व रियल इस्टेट उद्योग सेना पुढे आली असून त्यांच्या माध्यमातून घेत घेताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी यासाठी जनजागृती देखील करण्यात येत आहे. त्यातच पनवेल उरण सह नैना क्षेत्रातील होत असलेल्या गृह प्रकल्पांबाबत वाशी येथे बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई तर्फे दरवर्षी प्रदर्शन भरवण्यात येते. या प्रदर्शनाला विरोध न करता रियल इस्टेट सेनेचे प्रशांत अनगुडे यांनीप्रदर्शनात महारेरामध्ये नोंदणी झालेल्या विकासकांच्या प्रकल्पांचेच स्टॉल लावण्यास परवानगी द्यावी, त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही अशी मागणी केली आहे.अनगुडे यांनी मुख्यमंत्री, शहरी विकास सचिव, नवी मुंबई पोलिस आयुक्त आणि महा रेरा सचिवांना देखील याबाबतचे पत्र पाठवले आहे.