sowing

राज्यात ७ जूनपासून मान्सून (Monsoon Update) पावसाला सुरुवात होते आणि त्यामुळं जूनअखेर दरवर्षी जवळपास ५४ लाख हेक्टरवर पिकांची पेरणी होते. मात्र, यंदा पावसानं दडी मारल्यानं १७ जूनपर्यंत केवळ एक टक्के क्षेत्रावरच खरीप पिकांची पेरणी (Sowing) तथा लागवड झाली आहे.

    मुंबई: राज्यात मान्सून (Monsoon Update) दाखल झाला असला तरी अद्याप फारसा पाऊस पडत नसल्याचं चित्र दिसत आहे. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत.  राज्यात आत्तापर्यंत केवळ १ टक्काच पेरणी (Sowing In Maharashtra) झाली आहे. महाराष्ट्रात १८ जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. दरम्यान, ७५ मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करण्याचा सल्ला कृषीतज्ञांकडून दिला जात आहे. पावसानं ओढ दिल्यानं धरणांचं पाणीही कमी झालं आहे. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

    मान्सूननं महाराष्ट्र व्यापला असल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात राज्यभरात सगळेजण पावसाची प्रतीक्षा आहे. जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी राज्यभरात केवळ १ टक्काच पेरणी झाली आहे. राज्यातील खरीपाच्या दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी १७ जूनपर्यंत केवळ एक लाख ४७ हजार हेक्टरवर (एक टक्का) पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी १७ जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. पण, आता पावसानं दडी मारल्याने शेतकऱ्यांना पेरणी करण्यासारखी परिस्थिती नाही. राज्यात खरीप हंगामातील तृण धान्याखालील क्षेत्र ३६ लाख ३७ हजार हेक्टरपर्यंत आहे. तर तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सुर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र ४१ लाख ५८ हजार हेक्टर तर कापसाचं क्षेत्र जवळपास ४२ लाख हेक्टरपर्यंत आहे.

    राज्यात ७ जूनपासून मान्सून पावसाला सुरुवात होते आणि त्यामुळं जूनअखेर दरवर्षी जवळपास ५४ लाख हेक्टरवर पिकांची पेरणी होते. मात्र, यंदा पावसानं दडी मारल्यानं १७ जूनपर्यंत केवळ एक टक्के क्षेत्रावरच खरीप पिकांची पेरणी तथा लागवड झाली आहे. गेल्या वर्षी १७ जूनपर्यंत सरासरी १२०.४ मिलिमीटर पाऊस पडला होता. पण, यंदा जून महिन्यात ९० मिलिमीटर एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळं जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. पेरणी केलेल्या बियादेखील उगवलेल्या नाहीत. शेतकरी चिंतातूर झाला आहे.

    दरम्यान पेरणीची घाई करु नये असे मत कृषी विभाग आणि तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. जोपर्यंत शेतामध्ये तीन ते चार इंच ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करणे हे धोकादायक ठरु शकते.