
शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने राज्यभरात शिवसंवाद यात्रा काढण्यात येत आहे. सध्या या यात्रेचा दुसरा टप्पा सुरु आहे. त्यात शिंदे गटाचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर टीका केली.
मुंबई : शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने राज्यभरात शिवसंवाद यात्रा काढण्यात येत आहे. सध्या या यात्रेचा दुसरा टप्पा सुरु आहे. त्यात शिंदे गटाचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर टीका केली. ‘आम्ही काही क्षणांसाठी थोडेच घराबाहेर पडतो. केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही, तर लोकांमध्ये सतत वावरावे लागते’, अशा शब्दांत भुसे यांनी टीका केली.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलताना त्यांना निवडणुकीबाबत आव्हान दिले होते. त्यानंतर आता दादा भुसे यांनी विधान केले आहे. ते म्हणाले, आम्ही काही क्षणांसाठीच थोडे घराबाहेर पडतो. केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही. तर लोकांमध्ये सतत वावरावे लागते. सहा महिन्यांपासून त्यांना तीन शब्दांच्या पलीकडे बोलता येत नाही. सरकार अत्यंत चांगले काम करत आहे. त्यामुळे विरोधकांकडे बोलण्यासाठी काही मुद्देच राहिलेले नाहीत. त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बोलले पाहिजे.
आदित्य ठाकरेंच्या विधानाचाही घेतला समाचार
आदित्य ठाकरे यांनी आजोबा चोरल्याचे म्हटले होते. त्यावर भुसे म्हणाले की, हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या मनाचा कोतेपणा येथे दिसून येतो. उद्या हे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनाही चोरले, असे म्हणतील. हा त्यांच्या मनाचा कमीपणा आहे, असेही त्यांनी सांगितले.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्रिपद आणि आमदारकीचा राजीनामा द्या. जनतेत उतरुन निवडणूक लढवून दाखवा. तुम्ही ठाण्यात लढणार असाल मी ठाण्यात येतो अन्यथा वरळी मतदारसंघात माझ्याविरुद्ध लढवून दाखवा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले. यानंतर आता शिंदे गटातील नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला.