Opening signs on interstate bridges vandalized by landlords, unknown before inauguration

सदर मार्गावरील वाहतूक सुरू झाली असली तरी अद्यापही तेलंगणा सरकारद्वारे या पुलाचे लोकार्पण झालेले नाही. लोकार्पणासाठी तेलंगणा शासनाद्वारे सिमेंटचे नामकरण फलक लावले होते. मात्र लोकार्पण न झाल्याने त्यावर काहीही लिहिले गेले नव्हते. मात्र, अज्ञातानी लोकार्पण फलकासह पुलाच्या बाजूच्या संरक्षण भिंतीची तोडफोड केली आहे.

  गडचिरोली : महाराष्ट्र – तेलंगणा या दोन राज्याना जोडणाऱ्या प्राणहिता नदीवरील आंतरराज्यीय पुलाची रविवारी अज्ञातानी तोडफोड केल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. उद्घाटनापूर्वीच शुभारंभाचे फलक तोडफोड करण्यात आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलीस मदत केंद्राअंतर्गत मवेली मार्गावर नक्षल्यांनी बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केली होती. सदर रस्त्याचे बांधकाम व प्राणहिता नदी पुलाचे बांधकाम एकाच कंपनीने केले असल्याने या घटनेबाबत चर्चेला उधाण आले आहे.

  तेलंगणा शासनाने दोन वर्षापूर्वी प्राणहिता नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण केले होते. सदर मार्गावरील वाहतूक सुरू झाली असली तरी अद्यापही तेलंगणा सरकारद्वारे या पुलाचे लोकार्पण झालेले नाही. लोकार्पणासाठी तेलंगणा शासनाद्वारे सिमेंटचे नामकरण फलक लावले होते. मात्र लोकार्पण न झाल्याने त्यावर काहीही लिहिले गेले नव्हते. मात्र, अज्ञातानी लोकार्पण फलकासह पुलाच्या बाजुच्या संरक्षण भिंतीची तोडफोड केली आहे. तेलंगणा राज्य हद्दीत ही तोडफोड झाली आहे.

  एटापल्ली तालुक्यातील रस्ता बांधकाम व प्राणहिता नदी पुलाचे बांधकाम आंध्रप्रदेश राज्यातील वल्लभभानी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या एकाच कंपनीने केले आहे. त्यामुळे सदर कंपनीच्या निर्मित बांधकामावर सदर घटना घडल्याने परिसरात अनेक चर्चेला पेव फुटले आहे. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच कंपनीतर्फे घटनास्थळाची पाहणी केली गेल्याची माहिती आहे.

  दोन्ही राज्यातील पोलिसांनी केली पाहणी

  अहेरीचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे तसेच तेलंगणातील काजगनगरचे डीएसपी करुणाकरन, कवटालाचे सीआयबी स्वामी व चिंतालमाणेपल्लीचे एसआयजी विजय यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पूल बनविणाऱ्या अभियंत्याला सुद्धा बोलावले होते. मात्र फलक पाडले की, पडले हे स्पष्ट झाले नाही.

  फलके पाडण्याचे काम कुणाचे ?

  तेलंगणाच्या दिशेला पुलाच्या पलीकडे अगदी जवळ वाईन शॉप उभारण्यात आले आहे. पुलाच्या दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात गडचिरोली जिल्हा आहे. जिल्ह्यात दारुबंदी लागू असल्याने दररोज शेकडो लोक दारुसाठी तेलंगाणात जातात. आता या पुलावरील दुतर्फा फलके पाडण्याचे काम कुणाचे, याची चर्चा शहरात रंगली आहे.