सांगोला नगरपरिषदेकडून मुलींसाठी मोफत कराटे प्रशिक्षणासाठी ‘ऑपरेशन दुर्गा’

सांगोला नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती अंतर्गत शहरातील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थिनींना स्वरक्षणासाठी व मुलींच्या आत्मविश्वासात वाढ व्हावी, या हेतूने मोफ़त कराटे प्रशिक्षण हा उपक्रम 'ऑपरेशन दुर्गा' हाती घेतला.

    सांगोला : सांगोला नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती अंतर्गत शहरातील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थिनींना स्वरक्षणासाठी व मुलींच्या आत्मविश्वासात वाढ व्हावी, या हेतूने मोफ़त कराटे प्रशिक्षण हा उपक्रम ‘ऑपरेशन दुर्गा’ (Operation Durga) हाती घेतला असून, अशाप्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेणारी ही राज्यातील पहिली नगरपरिषद असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे (Kailas Kendre) यांनी दिली.
    राज्यात नगरपरिषद हद्दीतील महिला व बालक यांच्या कल्याणच्या कार्यक्रमासाठी नागरपरिषदांनी त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या वार्षिक उत्पन्नाच्या बांधील खर्च वजा जाता उर्वरित रकमेच्या पाच टक्के रक्कम राखून ठेवणे गरजेचे असते. या पाच टक्के निधीतून दरवर्षी महिला व बालकांच्या विकासासाठी विविध योजना व कार्यक्रम राबविले जात असतात. परंतु, यावर्षी पारंपारिक ठराविक कार्यक्रमांना फाटा देत मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या संकल्पनेतून शहरांतील पाचवी ते नववीच्या मुलींच्या स्वरक्षणासाठी मोफत कराटे प्रशिक्षणाचा ‘ऑपरेशन दुर्गा’ हा नाविन्यपूर्ण व विधायक उपक्रम नगरपरिषदेने हाती घेतला आहे.
    सांगोला नगरपरिषदेमार्फत राबिवण्यात येणाऱ्या या नावीन्यपूर्व उपक्रमाला शहरातून उत्तम प्रतिसाद मिळाला असून, तब्बल 75 मुलींच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. या प्रशिक्षणासाठी गौतम वाघमारे यांची प्रशिक्षक म्हणून निवड झालेली आहे. सदर प्रशिक्षण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिभवन येथे एक महिन्याच्या कालावधीसाठी घेण्यात येणार  आहे.