“सरकारला प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना खतम करायचे…, तुरुंगात डांबायचे, लोकशाहीच्या कोणत्या व्याख्येत बसते?”, सामनातून मोदी सरकारवर टिकास्त्र

मुळात निष्पक्ष निवडणुका हा लोकशाहीचा आत्मा आहे. आज निवडणूक आयोग व निवडणूक प्रक्रियेवरच लोकांचा विश्वास नाही. 'ईव्हीएम' पद्धतीत भाजप घोटाळा करत असल्याची शंका लोकांच्या मनात आहे. ईव्हीएममध्ये अदानी व्हायरस घुसवून लोकांची मते फिरवली जातात.

मुंबई- संसदेत अदानीवर प्रश्न विचारणाऱ्यांचे माईक आपोआप बंद होतात. लोकशाहीतली ही भुताटकी आहे. त्याच भुताटकीवर श्री. गांधी यांनी लंडन येथे सवाल निर्माण केले. लंडन ही लोकशाहीची जननी आहे असे मानले जाते. आपण दीडशे वर्षे इंग्रजांचे गुलाम होतो. त्या गुलामीच्या बेड्या तोडताना मोदी व भाजप कोठेच नव्हता. इंग्रज शेवटी आपण घालवलेच, पण जाता जाता ते ‘लोकशाही’ची भेट देऊन गेले हे विसरता येणार नाही. राहुल गांधी यांनी लोकशाहीवरील खदखद व्यक्त करण्यासाठी लंडनचे व्यासपीठ निवडले ते त्यासाठीच, असं आज सामना वृत्तपत्रातून केंद्रातील मोदी सरकारवर टिका करण्यात आली आहे.

…तर संसदेत माईक बंद केले जातात

हिंदुस्थानात लोकशाही उरली आहे का, हाच प्रश्न निर्माण झाला असताना लोकशाहीचा अपमान वगैरे झाला असा कंठशोष करणे हा निव्वळ फार्स आहे. राहुल गांधी लंडन येथे गेले व हिंदुस्थानी लोकशाहीवर त्यांनी शंका उपस्थित केल्या. ‘हिंदुस्थानातील लोकशाही धोक्यात आहे. विरोधी पक्षनेते बोलत असताना संसदेतील माईक बंद केले जातात,’ अशी टीका गांधी यांनी केली. त्यामुळे भाजप नेत्यांचे लोकशाहीवरील पुतनामावशीचे प्रेम उमातू जाताना दिसत आहे. संसदेच्या पहिल्याच दिवशी भाजप खासदारांनी गदारोळ केला व कामकाज बंद पाडले. पंतप्रधान मोदींना तर लोकशाहीच्या नावाने जणू हुंदकेच फुटत आहेत. राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन देशाचा अवमान केल्याचे ते जाहीर सभांतून बोलत आहेत. कर्नाटकात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. मोदी यांचे कर्नाटकात त्यामुळे जाणे-येणे वाढले आहे व कर्नाटकातील प्रत्येक सभेत ते राहुल गांधींनी लोकशाहीचा अपमान केल्याचं म्हणताहेत. असं आज सामनातून म्हटलं आहे.

विरोधकांना खतम करायचे, तुरुंगात डांबायचे…

सरकारला प्रश्न विचारणाऱ्या राजकीय विरोधकांना खतम करायचे, तुरुंगात डांबायचे हे लोकशाहीच्या कोणत्या व्याख्येत बसते? लोकशाहीत भाजप वॉशिंग मशीनचे नक्की कर्तव्य काय यावरही चिंतन होणे गरजेचे आहे. मुळात निष्पक्ष निवडणुका हा लोकशाहीचा आत्मा आहे. आज निवडणूक आयोग व निवडणूक प्रक्रियेवरच लोकांचा विश्वास नाही. ‘ईव्हीएम’ पद्धतीत भाजप घोटाळा करत असल्याची शंका लोकांच्या मनात आहे. ईव्हीएममध्ये अदानी व्हायरस घुसवून लोकांची मते फिरवली जातात. त्यामुळे मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्या ही लोकभावना आहे. आपण केलेल्या मतदानाविषयीच जेथे लोकांच्या मनात शंका आहे तेथे आलेल्या निकालावर व त्यानंतर निर्माण झालेल्या सरकारवर तरी कसा विश्वास ठेवणार? लोकशाहीचा घोळ येथेच आहे व याच घोळाला मोदी व त्यांचा पक्ष मजबूत लोकशाही मानत आहे. निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे, पण सरळ मार्गाने निवडणुका घेण्यात ती असफल ठरली आहे. शिवसेनेच्या स्वामित्वाचा निकाल देताना निवडणूक आयोगाने घटना तसेच लोकशाहीची सर्व नीतिमूल्ये पायदळी तुडवली. अशी टिका आज सामनातून करण्यात आली आहे.